Video । करोनाने ६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने नातेवाईक संतप्त; डॉक्टरवर केला जीवघेणा हल्ला

बंगळुरू – करोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट देशासाठी अत्यंत घातक ठरली आहे. विषाणू संसर्गाचा प्रचंड वेग असलेल्या या लाटेमध्ये देशातील नव्या बाधितांच्या संख्येने नकोसे विक्रम रचले. रुग्णसंख्येचा झालेला विस्फोट आरोग्यव्यवस्थेचे कंबरडे मोडणारा ठरला. अशा बिकट परिस्थितीतही आरोग्यकर्मी व डॉक्टरांनी अहोरात्र रुग्णसेवा केली. मात्र याच आरोग्यकर्मी डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत असल्याच्या काही दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत.

डॉक्टरांवरील हल्ल्याचा असाच एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये करोनाबाधा झाल्याने मृत्युमुखी पडलेल्या एका ६ वर्षीय बालकाचे नातेवाईक डॉक्टरांना मारहाण करताना दिसतायेत. या हल्ल्यात डॉक्टर रक्तबंबाळ झाल्यानंतरही नातेवाईकांना त्यांची दया आली नाही.  प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील आहे.

पोलिसांनी व्हिडीओ समोर आल्यानंतर कारवाईचा बडगा उचलला असून आतापर्यंत ४ जणांना  अटक करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्यांमध्ये एक इसम मृत बालकाचा नातेवाईक असून इतर तिघे त्याचे मित्र आहेत.

शहराचे एसपी एमएच अक्षय यांनी याबाबत माहिती देताना, ‘ही घटना जिल्ह्यातील तारिकेरे भागात सोमवारी घडली असून यामध्ये ५० वर्षीय डॉक्टर दीपक यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेच्या १८ तासांमध्येच चौघा आरोपींना जेरबंद करण्यात आलं आहे.’ असं सांगितलं.

दरम्यान, या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या डॉक्टरांवर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हल्ल्यानंतर डॉक्टरांच्या संघटनेने मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना पत्र लिहीत डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी लीगल सेल स्थापित करण्याची मागणी केली. तसेच गेल्या ८ ते १० महिन्यामध्ये राज्यात डॉक्टरांवर हल्ल्याच्या १२ घटना घडल्याचंही निदर्शनास आणून दिल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.