बेळागाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळागाव येथील एका जाहीर सभेत अतिरिक्त पोलिस अधीक्षक (ASP) नारायण भरमनी यांच्यावर हात उगारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (BJP) काही महिला कार्यकर्त्यांनी सभेत व्यत्यय आणल्याने संतप्त झालेल्या सिद्धरामय्या यांनी ASP ला मंचावर बोलावून त्यांना फटकारले आणि थप्पड मारण्याचा इशारा केला. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, जनता दल (सेक्युलर) (JDS) ने सिद्धरामय्या यांच्यावर अहंकार आणि अनुचित वर्तनाचा आरोप करत तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकरण?
सिद्धरामय्या बेळागाव येथे काँग्रेसच्या ‘संविधान बचाव’ परिषदेत भाषण करण्यासाठी आले होते. यावेळी मंचाच्या जवळ BJP च्या काही महिला कार्यकर्त्यांनी काळे कापड दाखवत आणि घोषणाबाजी करत राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शने केली. या व्यत्ययामुळे चिडलेल्या सिद्धरामय्या यांनी मंचावरून “ऐ पोलिस!” असे ओरडत ASP नारायण भरमनी यांना बोलावले. त्यांनी भरमनी यांना “SP कोण आहे? तुम्ही काय करताय?” असे विचारत अपमानास्पद शब्दांत फटकारले आणि हात उगारला, ज्यामुळे ते थप्पड मारणार असल्याचे दिसले. भरमनी यांनी त्वरित मागे सरत स्वतःचा बचाव केला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला.
,@siddaramaiah ನಿಮಗೆ ಅಧಿಕಾರದ ದರ್ಪ ತಲೆಗೇರಿದೆ.
ಜಿಲ್ಲಾ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗೆ ಹೊಡೆಯಲು ಕೈ ಎತ್ತುವುದು ನಿಮ್ಮ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ, ಘನತೆಗೆ ಕಿಂಚಿತ್ತೂ ಶೋಭೆ ತರುವುದಿಲ್ಲ.
ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿರುವ ನೀವು, ಬೀದಿ ರೌಡಿಯಂತೆ ಸಾರ್ವಜನಿಕ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿಯೇ ಏಕವಚನ ಪ್ರಯೋಗಿಸಿ, ಎಸ್ಪಿ (SP)ಗೆ ಹೊಡೆಯಲು ಯತ್ನಿಸಿದ್ದು ಅಕ್ಷಮ್ಯ… pic.twitter.com/GXeZbtk73t
— Janata Dal Secular (@JanataDal_S) April 28, 2025
JDS चा आक्रमक पवित्रा
JDS ने या घटनेचा तीव्र निषेध करत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार टीका केली. पक्षाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले, “@siddaramaiah
, तुम्हाला सत्तेचा अहंकार डोक्यात गेला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकावर हात उगारणे तुमच्या पदाच्या आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने अयोग्य आहे. सार्वजनिक मंचावर एकेरी भाषा वापरून आणि SP वर हात उगारणे हा रस्त्यावरील गुंडासारखा व्यवहार असून अक्षम्य अपराध आहे. तुमचा कार्यकाळ फक्त 5 वर्षांचा आहे, पण सरकारी अधिकारी 60 वर्षांपर्यंत सेवा देतात. सत्ता कायमस्वरूपी नसते, तुमचे वर्तन सुधारा.”
BJP नेही सिद्धरामय्या यांच्यावर टीका करत हा प्रकार सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप केला. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी सिद्धरामय्या यांच्या वर्तनाचा निषेध करत म्हटले, “लोकशाहीत प्रत्येकाला निदर्शने करण्याचा अधिकार आहे. सिद्धरामय्या यांचे हे कृत्य निंदनीय आहे.”
युद्धावरूनही वाद –
या घटनेपूर्वी सिद्धरामय्या यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान युद्ध टाळण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता. त्यांनी म्हटले होते, “युद्ध ही पहिली पायरी नसावी. केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी आणि कूटनीतीला प्राधान्य द्यावे.” या वक्तव्यावर BJP ने टीका करत त्यांना पाकिस्तान समर्थक ठरवले, तर सिद्धरामय्या यांनी स्पष्टीकरण देत म्हटले, “मी युद्धाला पूर्णपणे विरोध केलेला नाही, पण युद्ध हा शेवटचा पर्याय असावा.”
सोशल मीडियावर संताप –
सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांनी सिद्धरामय्या यांच्यावर संताप व्यक्त केला. एका युजरने लिहिले, “मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकाऱ्याला अशा प्रकारे अपमानित करणे लज्जास्पद आहे.” दुसऱ्या युजरने प्रश्न उपस्थित केला, “काँग्रेसवाले संविधानाचे रक्षक असल्याचा दावा करतात, पण स्वतःच्या अधिकाऱ्यांवर हात उगारतात?”
यापूर्वीही वाद –
ही पहिलीच घटना नाही ज्यामुळे सिद्धरामय्या वादात सापडले आहेत. 2019 मध्ये त्यांनी मैसूर विमानतळावर आपल्या एका कार्यकर्त्याला थप्पड मारली होती, तर 2023 मध्ये बेंगलुरूत एका समर्थकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याशिवाय, त्यांनी एका महिला कार्यकर्त्याचा माइक हिसकावून तिचा अपमान केल्याची घटनाही चर्चेत होती.