बंगळुरू : विरोधकांकडून होत असलेल्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. विरोधकांना म्हणजे भाजप आणि जेडीएसला तशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मैसुरू शहरी विकास प्राधिकरणाच्या (मुडा) जमीन वाटप प्रक्रियेत घोटाळा झाला. त्याचा लाभ सिद्धरामय्या यांच्या निकटवर्तीयांना मिळाला, असा आरोप भाजप आणि जेडीएस या मित्रपक्षांकडून केला जात आहे. त्यावरून सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप आणि जेडीएसने मैसुरू चलो मोर्चा सुरू केला. सिद्धरामय्या आणि कॉंग्रेस सरकारची कोंडी करण्यासाठीचे पाऊल म्हणून त्या मोर्चाकडे पाहिले जात आहे.
मात्र, मोर्चा सुरू झाल्यापासून सिद्धरामय्या यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर देण्याचे धोरण अवलंबले आहे. विरोधी पक्षांमधील अनेक नेते सत्तेत असताना घोटाळ्यांत सामील होते. त्यामुळे त्यांना माझ्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा नैतिक अधिकार नाही. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस.येडियुरप्पा यांच्यावर तर १८ ते २० घोटाळे केल्याचे आरोप आहेत, असे सिद्धरामय्या यांनी म्हटले.