बंगळुरू – कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज श्रीराम नवमी दिवशी तुमकूर जिल्ह्यातील बिडनागेरे गावात 161 फूट उंच पंचमुखी हनुमानच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा येथील बिडनागेरे बसवेश्वरा मठाने उभारला आहे.
या पुतळ्याच्या अनावरणावेळी बोम्मई म्हणाले की, राज्यासाठी चांगला काळ येणार आहे. रामनवमीच्या शुभमुहूर्तावर परिसरात अनेक पवित्र कामे केली जात आहेत. आगामी काळात या भागात मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. पंचमुखी हे हनुमानाचे विशेष रूप आहे, ज्याचा रामायणात उल्लेख आहे. हनुमानाने जगाच्या कल्याणासाठी हे रूप धारण केले होते. हनुमानाची 161 फूट उंचीची मूर्ती कर्नाटकात बसवावी, ही ईश्वरी इच्छा आहे. शिल्पकारांनी अप्रतिम काम केले आहे, असे बोम्मई म्हणाले.