कर्नाटकमधील बंडखोर आमदारांकडून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान

सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली -कर्नाटकमधील कॉंग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी आमदार म्हणून अपात्र ठरवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांची बंडखोरी त्या मित्रपक्षांना भोवली. त्यांचे आघाडी सरकार बंडखोरीमुळे कोसळले.

मात्र, विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा देण्याआधी के.आर.रमेश कुमार यांनीही त्या बंडखोरांना दणका दिला. कुमार यांनी त्या बंडखोरांना आमदार म्हणून अपात्र ठरवले. त्यातील रमेश एल.जारकीहोली आणि महेश कुमाथल्ली या कॉंग्रेसच्या दोन बंडखोरांनी त्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

भाजपचे नेते बी.एस.येडियुरप्पा यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केल्याच्या दिवशीच ती घडामोड घडली. कुमार यांचा निर्णय अवैध आणि मनमानी स्वरूपाचा असल्याचे बंडखोरांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे. बंडखोरांना अपात्र ठरवताना कुमार यांनी त्यांचे राजीनामे फेटाळले. ते राजीनामे स्वेच्छेने देण्यात आले नसल्याची भूमिका कुमार यांनी घेतली. त्यावरही बंडखोरांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यामुळे कर्नाटकचे राजकीय नाटक पुन्हा एकदा न्यायालयात पोहचले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.