कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॉंग्रेसमधील खदखद वाढली

आता फेरबदलाचा उपाय योजणार

बंगळूर -कर्नाटक मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर सत्तारूढ आघाडीचा घटक असणाऱ्या कॉंग्रेसमधील खदखद आणखीच वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे असंतुष्टांची नाराजी दूर करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ फेरबदलाचा उपाय योजला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

कर्नाटक कॉंग्रेसमधील नाराजीने काही दिवसांपासूून डोके वर काढल्याने जेडीएसच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार आहे. तशातच लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आणि जेडीएस या मित्रपक्षांना सपाटून मार खावा लागला. त्यामुळे त्यांच्यात धुसफूस सुरू झाली. त्यापार्श्‍वभूमीवर, राज्य सरकारपुढील धोका टाळण्यासाठी शुक्रवारी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानुसार भाजपशी जवळीक साधत असणाऱ्या दोन अपक्ष आमदारांना मंत्री करण्यात आले.

पण, तेवढ्याने सत्तारूढ आघाडीपुढील समस्या संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. अपक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने मंत्रिपदाची आस लागून राहिलेले कॉंग्रेसमधील असंतुष्ट आणखीच नाराज झाल्याचे चित्र आहे. कॉंग्रेसचे काही महत्वाचे नेते नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थित राहिले. त्यामुळे कॉंग्रेसमधील नाराजीवर शिक्कामोर्तब झाले.

त्यातून सरकारपुढील धोका टळला नसल्याची जाणीव झालेले कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले. पुढील सहा ते आठ महिन्यांत राज्य मंत्रिमंडळात निश्‍चितच फेरबदल होईल. मंत्र्यांची कामगिरी विचारात घेतली जाईल. मंत्रिपदाची संधी न मिळालेल्या ज्येष्ठ आमदारांचाही फेरबदलावेळी विचार होईल, असे त्यांनी म्हटले.

त्यामुळे सरकारपुढील धोका टाळण्यासाठी मंत्रिमंडळ फेरबदलाचे पाऊल उचलले जाईल किंवा फेरबदलाच्या नावाखाली मंत्रिपदावर डोळा ठेऊन असलेल्या असंतुष्टांना झुलवत ठेवण्याची खेळी केली जाईल, असे स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.