बंगळुरू : कर्नाटकात होणाऱ्या पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाने 13 अपात्र बंडखोर आमदारांना आपल्या पक्षाची उमेदवारी जाहीर केली. अद्याप दोन जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीत.
कुमारस्वामी सरकारमधून बाहेर पडून 17 आदारांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता. त्यांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या 15 मतदार संघातील पोटनिवडणुकीत या 13 आमदारांना भाजपाची उमेदवारी देण्यात आली.
महेश कुमातल्ली (अथणी), श्रीमंतगौडा पाटील (कागवाड), रमेश जारकीहोळी (गोकाक), श्रीराम हेब्बर (येल्लापूर), बी. सी. पाटील ( हिरेकेरूर),आनंद सिंह (विजयनगर), के. सुधाकर (चिक्कबल्लापूर), ब्यारती बसवराज ( के. आर. पुरम), एस. टी. सोमशेखर (यशवंतपूर) आणि एमटीबी नागराज (होस्कोट) अशी उमेदवारी देण्यात आलेल्या आमदारांची नावे (मतदारसंघ) आहेत. या विधानसभेची मुदत संपेपर्यंत म्हणजे 2023 पर्यंत या आमदारांना अपात्र ठरवण्याचा अध्यक्षांचा निर्णय सर्वोच्च न्यायलयाने रद्द ठरवला. त्यामुळे ते या निवडणुकीला सामोरे जात आहेत. मात्र त्यांचा प्रचार करण्यास भाजपा कार्यकर्ते अनुत्सुक असल्याचे बोलले जात आहे.
या 15 जगांपैकी सहा जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी होणे हे बहुमत कायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. 17 पैकी 15 जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. तर दोन जागांचा निकाल उच्च न्यायलयात प्रलंबित आहे. त्यामुळे तेथे पोटनिवडणूक जाहीर झाली नाही. या 15 बंडखोरांपैकी 12 कॉंग्रेसचे तर तीन जनता दलाचे होते.