नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक १० मे रोजी पार पडणार असून १३ मे ला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षासह सर्वपकाशीय नेत्यांनी आगामी निवडणुकीत विजयाचा दावा करत आहेत. त्यातच मुख्यमंत्री बोम्मई यांनी भाजप मोठ्या बहुमताने पुन्हा सत्तेत येईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर केले. त्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांनी आगामी निवडणुकीसाठी आपण तयार असल्याचे म्हटले आहे. याविषयी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, ‘पक्ष आणि सरकार निवडणुकीसाठी तयार असून यासाठी पक्षाची जय्यत तयारी सुरू आहे. आम्ही बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वासदेखील यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच विरोधी पक्षाच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी लोक काँग्रेसला धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाहीत असे म्हटले आहे.
यापूर्वी विरोधी पक्ष नेते डी.के.शिवकुमार यांनी, काँग्रेस निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार आहे. आम्हाला हे सरकार बरखास्त करायचे आहे. ही निवडणूक विकासावर आधारित आणि भ्रष्टाचारमुक्त राज्य आणि देशासाठी असेल. भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असून पंतप्रधान मोदी त्याला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप शिवकुमार यांनी केला आहे.