कर्नाटक आणि आंध्रातील श्रीविठ्ठलभक्ती

– डॉ. विनोद गोरवाडकर

मराठी प्रांतातल्या पंढरपूरच्या श्रीविठ्ठलाची भक्‍त मराठी माणूस अतिशय आपुलकीने आजवर करीत आला आहे. भक्‍त पुंडलिकानंतरच्या काळात ज्ञानदेवांनी श्रीविठ्ठलाचा भक्‍तिमहिमा गाण्यास प्रारंभ केला. वारीची महती समजवली. समाजातला भेदभाव नष्ट करण्याची मुहूर्तमेढ रचली. साऱ्यांना भक्‍तिच्या सूत्रात गुंफले आणि पंढरपूर हे “साऱ्यांचे माहेर’ झाले. या माहेरीचे खरेखुरे आणि प्रमुख आकर्षण म्हणजे साऱ्यांच्या मनीमानसी वसलेली विठुमाऊली होय. श्रीविठ्ठलाची भक्‍ती महाराष्ट्राबाहेरही हजारो विठ्ठलभक्‍त आजवर करीत आलेले आहेत. त्यात प्रामुख्याने कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील विठ्ठलभक्‍तिचा उल्लेख या ठिकाणी विशेषत्वाने करावा लागेल…!

“कानडा विठ्ठलू कर्नाटकू’ हे ज्ञानदेवांचे सांगणे कर्नाटकातील विठ्ठलभक्‍तिच्या संदर्भातील आहे. अर्थात कर्नाटकातील विठ्ठलभक्‍तिच्या संदर्भात मतमतांतरे असली तरी संतसाहित्याचे अभ्यास डॉ. पंडित आवळीकर यांच्यामते “कानडा विठ्ठलू कर्नाटकू’ हे ज्ञानदेवांनी विठ्ठलाचे कर्नाटकामधील वास्तव्यविषयक प्रमाणपत्रच दिले आहे. त्यावरून तेराव्या शतकात विठ्ठल “कर्नाटकू’ आहे, ही समाजधारणा होती.

कर्नाटकातील दास संप्रदायाचे भक्‍तिकार्य अत्यंत मोलाचे आहे. ज्ञानदेवसमकालीन नरहरितीर्थ या माध्व मठाधिपतींनी दास संप्रदायाचा आणि साहित्याचा पाया घातलेला दिसतो. योगायोग असा की त्याच कालखंडात महाराष्ट्रात ज्ञानेश्‍वराची वारकरी सांप्रदायाचा आणि साहित्याचा पाया घातलेला दिसतो. योगायोग असा की त्याच कालखंडात महाराष्ट्रात ज्ञानेश्‍वरांनी वारकरी सांप्रदायाचा पाया “रचिला’. दास म्हणजे हरिचे दास असले दास सांप्रदायातील सांप्रदायिकांविषयी म्हटले जाते. एकीकडे हरिचे दास आणि माध्व परंपरेचे पायिक म्हणजे वैष्णव अशाप्रकारचा प्रवास दास संप्रदायाचा झालेला दिसतो.

“राम कृष्ण हरि’ या दैवतांचे पूजन करणारे दास आणि पंढरपुरी आलेला विठ्ठल हेही श्रीकृष्णाचेच रूप याचा परस्पर अनुबंध आपोआप कर्नाटक महाराष्ट्र यातील श्रीविठ्ठलाच्या माध्यमातून निर्माण झालेले नाते सिद्ध करतो. नरहरितीर्थांनंतर त्यांच्याजागी आलेल्या श्रीपादरायांनी “रंगविठ्ठला’ या नावाने कन्नडमध्ये ये विठ्ठलभक्तीला वाहिलेली काव्यरचना केलेली दिसते. ही काव्यरचना दास परंपरेमध्ये महत्त्वाची ठरली आहे. “पुरंदरदास’ हे विठ्ठल भक्‍तिच्या दास परंपरेतील एक अत्यंत महत्त्वाचे नाव म्हणता येईल.

एकीकडे कर्नाटकमध्ये विठ्ठलभक्‍तिची धारा अशाप्रकारे वाहात असतानाच आंध्र प्रदेशातील विठ्ठलभक्‍तिही तुलनेने तेवढी. महत्त्वपूर्ण ठरली आहे. या विषयावर सखोल प्रकाशझोत टाकणारे प्रा. माणिक धनपलवार यांच्यामते “आंध्र प्रदेशात विठ्ठल हे दैवत तसे प्राचीन काळातच आले आहे. यासंबंधिचा शीलालेखीय पुरावा भरभक्‍कम आहे. उपलब्ध असणाऱ्या शीलालेखात “भट्टिप्रोलू’ येथील शिलालेख सर्वात प्राचीन म्हणावा लागेल. गुंटूर जिल्ह्यातील रेपल्ले तालुक्‍यातील भट्टिप्रोलू या गावी विठ्ठलेश्‍वराचे देवालय आहे. या देवालयातील शीलालेख शके 1066 इ.स. 1144 चा असून त्यात विष्णूवर्धन कुलेत्तुंग चोक गोंगा याने विठ्ठलेश्‍वराला जमीन दान दिल्याचा उल्लेख आहे.”

वर उल्लेखिलेला शीलालेख पंढरपूर येथील शीलालेखापेक्षा 45 वर्षांनी जुना असल्याने त्याकडे श्रीविठ्ठलाच्या नामाच्या उल्लेखाची प्राचीनता आपोआप जाते. याशिवाय आंध्रामध्ये श्रीविठ्ठलाच्या संदर्भातील सापडलेले विविध शीलालेख श्रीविठ्ठलभक्‍तिच्या तेथील परंपरेचा पुरावाच म्हणावे लागतील.

आंध्र प्रदेशातील व्यक्तींची नावे विठ्ठलावरून वा विठ्ठलाच्या संदर्भात लिहिलेली आढळतात. पंढरपूरच्या श्रीविठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी धनस्वरुपी हातभार लावणाऱ्या व्यक्तींमध्ये तेलुगुभाषिकांचीही नावे दिसून येतात. शके 1195 मध्ये ही मदत करण्यात आलेली आहे. आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध भक्त श्रीअन्नमाचार्य यांनीही आपल्या काही पदांमध्ये श्रीविट्ठलाचे गुणगान केले आहे. विठ्ठल, पांडुरंगाराय असा उल्लेख असणाऱ्या या पदातील एक पदात श्रीविठ्ठलाचे 777 भक्त झाल्याचेही म्हटले आहे. “पांडुरंगमहात्म्मु’ हे काव्य कृष्णदेवरायाच्या दरबारी असणाऱ्या आठ कवींपैकी तेनालीरामकृष्ण यांनी लिहिले आहे. या काव्यात प्रारंभी काही दैवतकथांचा ऊहापोह करून कविने डोक्‍यावर मोराची पिसे असणारा, कंबरेवर हात ठेवून उभा असलेला श्रीकृष्ण दाखविला आहे. भक्त पुंडलिकास पांडुरंगाने दिलेले दर्शन या घटनेतून कविला दाखवावयाचे आहे. या ग्रंतात पंढरपूरचा स्पष्ट उल्लेख नसला तरी “पौडरीक क्षेत्र’ असा उल्लेख आलेला आढळतो.

याशिवाय एकोणिसाव्या शतकात म्हणजे अर्वाचिन काळात “भक्तविजयमु’ हा संतचरित्रपर ग्रंथ निर्माण झालेला दिसतो. पुट्टपर्थी नारायणाचार्युलु यांचा सहाशे बावीस पुष्ठांचा “पंढरीभागवतमु तसेच विविध लेख कविंच्या स्फूट काव्यरचना यांचाही उल्लेख या ठिकाणी करावयास हवा. तेलुगु भक्तांनी श्रीविठ्ठलासोबत त्याच्या आचारविचारांचा आणि महाराष्ट्रातील विविध भक्तांचाही ऊहापोह केलेला दिसतो. आंध्र-महाराष्ट्र सीमेवरील मराठी-तेलुगु अशा द्वैभाषिक कीर्तनकारांनी आपल्या कीर्तनाचा विषय विठ्ठलभक्ती हा ठेवलेला आहे. “”रंडय्‌यो रंडय्‌यो, पंडारीपूरमुनकु। सेविंची वत्तामु श्रीपांडुरंगानिने रे पटीको मापटीको। मन तनुकु शाश्‍वतमा उपिरी उंडगणे वकसारी पोईवस्ताम।।” हे तेलुगुतील भाषेतील खेड्यापाड्यात लोकप्रिय असणाऱ्या गीताचा आशय “चला लोगहो, पंढरपूरला चला. तेथे जाऊन आपण विठ्ठलाची भक्ती करू, कारण या नश्‍वर देहाचा काय भरवसा’असा आहे. एकंदरीत कर्नाटक आणि आंध्रातील श्रीविट्ठल भक्तीची परंपरा अशाप्रकारे वैभवशाली म्हणावी लागेल.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)