पुणे,दि.26 – कोकणातील हापुससारखा चवीला असणाजया कर्नाटकातील आंब्यांचा हंगाम सुरू झाला असून सध्या मार्केटयार्डातील फळबाजारात कर्नाटकातील आंब्यांच्या दहा ते बारा हजार पेट्यांची आवक होत आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्नाटक आंब्याचे दर खूप कमी झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत कर्नाटकातील आंब्यांच्या दरात 40 ते 50 टक्क्यांनी घट झाली आहे. मार्च महिन्यात कर्नाटकातील आंब्यांची आवक सुरू होती. कर्नाटकातील तुमकुर परिसरातून आंब्यांची आवक होते. जून महिन्यांपर्यंत कर्नाटकातील आंब्याचा हंगाम सुरू असतो, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते संघटनेचे सचिव, आंबा व्यापारी रोहन उरसळ यांनी दिली.
सध्या घाऊक बाजारात कर्नाटकातील आंब्यांची आवक वाढत असल्याने दरात घट झाली आहे. मे महिन्यात आंब्याची आवक आणखी वाढेल. करोनाच्या संसर्गामुळे निर्बंध आहेत.
आंबा खरेदीदारांची संख्या कमी आहे. अशा परिस्थितीत कर्नाटकातून घाऊक फळबाजारात आंब्यांची आवक वाढत आहे. त्यामुळे कर्नाटक हापूस आंब्यांच्या दरात घट झाली आहे. मुंबई, बंगळुरू, अहमदाबाद, इंदुर, नागपूर, जयपूर येथील बाजारातदेखील मागणीअभावी कर्नाटक हापूसचे दर कमी झाले आहेत,असे उरसळ यांनी सांगितले.
कर्नाटक आंब्याचे दर पुढीलप्रमाणे-
कर्नाटक हापूस आंबा पेटी (तीन ते पाच डझन)- 600 ते 1000 रुपये, पायरी- 500 ते 800 रुपये (चार डझन, पाच डझन), लालबाग- 20 ते 40 रुपये किलो, तोतापुरी-20 ते 35 रुपये, मलिका-40 ते 60 रुपये.