यवत – भांडगाव (ता. दौंड) च्या हद्दीत असलेल्या कारंडे-पिंगळे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षिका अध्यापनाचे काम व्यवस्थित करीत नसल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने त्या शिक्षकेची बदली करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांची केली आहे. बदली न केल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
चौथीपर्यंत शाळा असून, या शाळेत जवळपास 40 विद्यार्थी आहेत. येथे एक शिक्षक आणि एक शिक्षिका असे दोघेजण कार्यरत आहेत. मात्र, रुपाली जगदाळे ही शिक्षिका अध्यापनाचे काम व्यवस्थित न करता शाळेच्या वेळात झोपत असल्याचे स्थानिक ग्रामस्थ लिंबाजी पिंगळे, संतोष पिंगळे, मल्हारी हाके, बिरा पिंगळे यांनी सांगितले. यासाठी गटविकास अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे चार-पाच वेळा अर्ज करून मागणी केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दौंडचे गटविकास अधिकारी गणेश मोरे म्हणाले की, या शाळेविषयी ग्रामस्थांच्या तक्रारी आल्या असून केंद्रप्रमुखांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रप्रमुख हे विद्यार्थी, पालक व मुख्याध्यापक यांचे जबाब घेऊन अहवाल सादर करतील. अहवाल प्राप्त झाल्यावर तो जिल्हा परिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येईल.