पुणे – “एफटीआयआय’ संस्थेत शिक्षण घेत असताना तीन विद्यार्थ्यांना संस्थेतील एकाही दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम मिळाले नाही. यामुळे नाराज झालेले ते विद्यार्थी थेट संचालकांच्या कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी बसले. यावेळी संस्थेचे संचालक होते गिरीश कर्नाड आणि आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये होते प्रसिद्ध अभिनेते नसीरूद्दीन शहा आणि ओमपुरी.
सुमारे तीन ते चार दिवस हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर कर्नाड यांनी नसीरूद्दीन शहा यांना आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. त्यांनी एक पाकिट शाह यांच्या समोर ठेवले आणि म्हणाले, “तुझ्यासाठी हे पाकिट आले आहे. तु आंदोलनात व्यस्त होतास म्हणून दिले नाही. एकदा बघून घे काय आहे ते’. शाह यांनी ते पाकिट उघडले. त्यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या “निशांत’ चित्रपटासाठी ऑडिशनचे निमंत्रण आणि रेल्वेच्या प्रवासाची तिकिटे होती. सोबतच “विथ स्पेशल रेफरेन्स ऑफ मि. गिरीश कर्नाड’ हेदेखील लिहले होते. पुढे शाह यांनी ती ऑडिशन दिली आणि तोच त्यांचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा चित्रपट ठरला. अशा प्रकारे हिंदी चित्रपट सृष्टीला एक हुरहुन्नरी अभिनेता देण्याचे काम कर्नाड यांनी केले होते. संस्थेच्या अभिनय विभागाचे माजी अधिष्ठाता अमित त्यागी यांनी अशी आठवण सांगितली.