करमाळा : 300 वर्षांपूर्वी म्हणजेच 1727 साली श्री. राजे रावरंभा निंबाळकर यांनी बांधलेल्या श्री कमलाभवानी मंदिर कोरोनाच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच बंद ठेवण्यात आलेले आहे.
नवरात्रीनिमित दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी इथे येत असतात. मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात देवीचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो. परंतु यावर्षी हे चित्र काही वेगळे पाहायला मिळत आहे. भविकांशिवाय यावेळी नवरात्र साजरी होत आहे. त्यामुळे मंदिर परिसर सुना सुना वाटत आहे. मोठी जत्रा इथे भरत असल्याने अनेकांच्या हातांना काम मिळते.
या मंदिराला तुळजापूरच्या तुळजाभवानीचे दुसरे पीठ मानले जाते. हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या बांधकामात 96 या संख्येला अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे.
या मंदिरात एकूण 96 खांब आहेत. येथील 3 दिपमाळेस 96 पायऱ्या आहेत. त्याचबरोबर मंदिरात 96 ओवऱ्या आणि मंदिरासमोर असलेल्या हत्ती बावरास देखील 96 पायऱ्या आहेत त्याला 96 पायरी विहीर म्हणून देखील ओळखले जाते.