जामखेड(प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एच.डी.एफ.सी. बँकेच्या सहकार्यातून आ.रोहित पवार आणि कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातुन कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी मोबाईल क्लिनिक व्हॅनचा उद्घाटन (फिरत्या दवाखाना) आणि एक्स-रे व ईसीजी मशीनचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि.१३ रोजी) सकाळी ९:३० वाजता कर्जतच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पार पडणार आहे.
यावेळी सर्व साधारण आजाराकरिता मोफत औषधे,मोफत आरोग्य तपासणी,रक्तदाब,मधुमेह तपासणी,प्रथमोपचार,ए आय एक्स-रे व सीबीसी रक्त चाचणीद्वारे फुफ्फुसाच्या रोगांचे निदान या शिबिराचे उद्घाटन होणार असुन पोर्टेबल एक्स-रे मशीन व पोर्टेबल थ्री चॅनेल इसीजी मशीनचे लोकार्पण होणार आहे. बारामती ऍग्री कल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे.
मोबाईल क्लिनिक व्हॅन व अन्य यंत्रणा तालुका आरोग्य विभागाला उपयुक्त ठरणार असुन मतदारसंघातील गावांना आरोग्याबाबत मोठा दिलासा मिळणार आहे. आता दि.१३ फेब्रुवारीपासुन २७ फेब्रुवारीपर्यंत कर्जत तालुक्यातील २६ गावातील तर १ मार्च ते १३ मार्च या कालावधीत जामखेड तालुक्यातील २३ गावातील नागरिकांची या आधुनिक यंत्रणेने सज्ज असलेल्या मोबाईल क्लिनिक व्हॅनद्वारे विविध आजारांची मोफत तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
या व्हॅनमध्ये डॉक्टर, ड्रायव्हर,हँड सॅनिटायझर,फॉर्म व केसपेपर,पीपीई किट,स्टेथोस्कोपी,इन्फ्रारेड गण,ब्लड प्रेशर,कपडा मास्क, ऑक्सिमिटर,मलमपट्टी साहित्य,ग्लुको मिटर,औषधे आदींचा सामावेश असणार आहे. ही मोबाईल क्लिनिक व्हॅन रुग्णांवर उपचारच नव्हे तर वैद्यकीयदृष्ट्या लक्षणानुसार रोगांचे निदान करून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यास मदत करणार आहे. त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयात एक्स रे, ईसीजी मशिनद्वारे रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे.
आमदार रोहित पवारांच्या संकल्पनेतुन सध्या अनेक योजना मतदारसंघातील तळागाळापर्यंत पोहोचत आहेत. कोरोना काळातही मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आ. पवार यांनी नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. आता ही मोबाईल व्हॅन नागरिकांसाठी आरोग्यदायिनी ठरणार आहे.