आरोग्य प्रश्नावर ‘सकल मराठा’ आक्रमक

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांवर प्रश्नांचा भडिमार

कर्जत – येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना समाधानकारक आरोग्य सुविधा मिळत नसल्याने सकल मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आशिष कोकडे यांनी रुग्णालयास भेट दिली. सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोकडे यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांची वानवा आहे. येथे व्हेंटिलेटर, सोनोग्राफी सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे, पुरेशी औषधे उपलब्ध नाहीत. रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या प्रश्नावर सकल मराठा समाज तसेच अस्मिता ग्रुपच्या वतीने निवेदन देऊन आक्रमक भूमिका घेण्यात आली होती.

गुरुवारी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी कर्जतला आले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार करीत आपली गऱ्हाणी मांडली. आरोग्य विभागाचे कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याने रुग्णांना अडचणीला सामोरे जावे लागते. साधनसामग्रीचा अभाव तसेच कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांना अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत कार्यकर्त्यांनी आरोग्याधिकारी यांना जाब विचारला. यावेळी डॉ कोकडे यांनी रुग्णालयात डॉक्‍टर उपलब्ध करून दिले जातील, तसेच नियोजनाबाबत योग्य दखल घेतली जाईल असे आश्वासन दिले.

अखत्यारीत नसलेल्या विषयांबाबत वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जाईल असेही डॉ.कोकडे यांनी सांगितले. यावेळी सकल मराठा समाजाचे समन्वयक प्रा. नानासाहेब धांडे, रुग्ण कल्याण समितीचे राम ढेरे, मेडिकल असोसिएशनचे पप्पू तोरडमल, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.ज्ञानेश्वर जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)