सिनेसृष्टीतील कोणत्याही कलाकाराला सुरुवातीला ऑडिशन नामक भीतीदायक पण महत्त्वाचा टप्पा पार करावा लागतो. यानंतर एकदा सिनेसृष्टीत नाव निर्माण झाल्यानंतर ऑडिशनचा प्रश्नच उरत नाही. उलट निर्माते-दिग्दर्शक आपणहूनच कलाकारांकडे धाव घेत असतात. अव्याहतपणाने चालत असणारे हे चक्र आहे.
पण सिनेसृष्टीची पार्श्वभूमी असणाऱ्या घराण्यातून आलेल्या अनेक नायिकांना ऑडिशन द्यावी लागत नाही. पण बॉलीवूडची बेबो करिनाने मात्र यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. एका मुलाखतीदरम्यान बोलताना तिने सांगितले की, आमीर खानच्या एका चित्रपटासाठी तिला ऑडिशन द्यावी लागली.
ती म्हणते, आपल्या 19 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासादरम्यान पहिल्यांदाच मी ऑडिशन दिली. कारण आमीरचे 100 टक्के समाधान होणे गरजेचे होते. या चित्रपटाचे नाव आहे “लाल सिंह चढ्ढा’.
यासंदर्भात आमीरचा करिनाला फोन आला आणि त्याने या चित्रपटात करिनाने काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
करीनाने स्क्रिप्ट वाचली, त्यादरम्यान आमीरचा पुन्हा फोन आला आणि त्याने काही प्रसंग वाचून त्याचा अभिनय तयार करून ठेव असे सांगितले. सुरुवातीला तिला हा काय मूर्खपणा आहे असे वाटले; पण पुन्हा तिने विचार केला की एकदा ऑडिशन द्यायला काय हरकत आहे! असे म्हणून एकेकाळी सुपरस्टार असणाऱ्या बेबोने ऑडिशन दिली.
सैफ अली खाननेही तिला “यात काहीच गैर नाही, अल पचीनोही आपल्या भूमिकेबाबत आधी टेस्ट देत असेफ असे सांगून करिनाला प्रोत्साहितच केले होते. करिना म्हणते की, काळ बदलत आहे आणि अशा वेळी मी काळानुसार बदलत नसेन तर ते चुकीचे आहे. त्यामुळेच मी होकार दिला!