नेरेमध्ये कारगिल विजय दिन उत्साहात ! मुळशी फ्रेश, सैनिक युवा फोर्स ऍकॅडमीतर्फे आयोजन

हिंजवडी – सैनिक युवा फोर्स व रामसोनाई उद्योग समूह तसेच मुळशी फ्रेश मार्केटच्या वतीने आयटीपार्क लगतच्या नेरे येथे कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धात शहीद झालेल्या शूरवीरांना मानवंदना देण्यात आली.
या वेळी जवानांच्या कर्तव्याची आठवण म्हणून कारगिल युद्धातील समर सेनानी व काही माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्याला इंडियन ऍग्रो आयडॉल मुळशी फ्रेशचे संस्थापक अध्यक्ष कैलास जाधव, सैनिक युवा फोर्सचे संचालक मेजर रामदास मदने (कारगिल योद्धा). 26/11 हल्ल्यातील इनएसजी कमांडो चांगदेव कडलग, अशोक जाधव (करगिल सहभाग), लाईफ रिपब्लिक सोसायटीतील माजी सैनिक राजेंद्र सिंग (नेव्ही), ओमप्रकाश पांडे (एअर फोर्स), अनिल सिन्नरकर (इंडियन आर्मी), अशोक वाजपेयी, यु. के. सिंग (पोष्ट मास्टर) यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व फोर्स ऍकॅडमीतील विद्यार्थी उपस्थित होते.
या वेळी बोलताना ऍग्रो आयडॉल जाधव म्हणाले, कारगिल युद्धात वीर मरण आलेल्या योध्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सामाजिक दायित्वाने आपण त्या शहीद जवानांच्या वीर माता व वीर पत्नींचा सन्मान केला पाहिजे. केवळ त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन चालणार नाही तर आगामी काळात देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या मुलांनाही शालेय मदत योग्य मार्गदर्शन देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
कारगिल योद्धा रामदास मदने यांनी या वेळी आपले कारगिल युद्धातील घडामोडींचे अनुभव कथन केले. सोहळ्याची सांगता मुळशी फ्रेशच्या वतीने सर्वांना मिठाईवाटप करून करण्यात आली.





