बॉलीवूडमधील बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर-खान सध्या प्रेग्नंट असतानाही काम आणि सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत आपल्या कामकाज आणि घराचे फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिने इंस्टाग्राम हॅंडलवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती आपले नवीन अपार्टमेंट डिझाईन करताना दिसत आहे. करिनाने इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत आपल्या “ड्रीम होम’ची चाहत्यांना झलक दाखविली. या फोटोत करिना ही इंटिरीयर डिझायनरला काही तरी सांगताना दिसत आहे. तसेच यात ती मिडी ड्रेसमध्ये दिसत असून तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.
या फोटोत अपार्टमेंटमध्ये एक मोठा बुक शेल्फ आणि घराच्या छताला झूमर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीत सैफ अली खान याने लॉकडाऊनच्या काळात एक नवीन अपार्टमेंट खरेदी केले असल्याचे सांगितले होते. तसेच त्याचे रिनोव्हेशन सुरू असून ते लवकरच तयार करण्यात येणार आहे.
सैफ-करिनाचा दुसरा मुलगा जन्माला येण्यापूर्वीच हे “ड्रीम होम’ सज्ज होणार असल्याचे समजते. वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास करिना कपूर अखेरच्या वेळी अक्षय कुमारसोबत “गुड न्यूज’मध्ये झळकली होती. तसेच तिने नुकतेच “लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. याशिवाय करिना कपूर ही करण जोहरचा मल्टी-स्टारर “तख्त’ चित्रपट करते आहे.