कर्डिलेंना उमेदवारी देऊन चूक केली : शरद पवार 

राहुरी – या भागाच्या पाणी प्रश्नाला न्याय देण्यासाठी प्राजक्त तनपुरे सारख्या युवा नेत्यांना ताकद दिली पाहिजे. आमदार शिवाजी कर्डिले यांना पक्षाकडून उमेदवारी देवून आम्ही चूक केली होती. राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्‍त केले.

राहुरीत नव्या पेठेत या मतदारसंघाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे व श्रीरामपूर मतदारसंघातले उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. राज्य व केंद्रातील सरकार कामगार, शेती, शेतकरी, उद्योगधंदे, बेरोजगार युवक, सर्वसामान्य जनता आदी समाजघटकांना न्याय देऊ शकलेले नाही. त्यांच्या हिताचे संवर्धन करण्यात हे अपयशी ठरले आहेत.अशा राज्य सरकारला आता घरी पाठवण्याची वेळ आली आहे असे ते म्हणाले.

हे सरकार शेतकरी विरोधी आहे. शेती व शेतकऱ्यांना हे न्याय देऊ शकले नाही. कांदा उत्पादकांच्या संसाराची होळी करणाऱ्या सरकारला धडा शिकविला पाहिजे. कारखानदारी आज बंद पडत आहे. हजारो लोकांचे रोजगार गेले आहेत. कारखानदारी आज तोट्यात आहे. अनेक कंपन्या बंद पडली आहेत. जेट विमान कंपनीतील 20 हजार कामगार बेरोजगार झाले आहेत तर एचएएल कंपनीत बारा हजार कामगार धरणे आंदोलन करत आहेत.

शंभर ते दीडशे उद्योजकांसाठी हे सरकार 80 हजार कोटी रुपये बॅंकांना मदत करते, मात्र शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी करावयास यांचे जवळ पैसा नाही. अशा सरकारला आपण धडा शिकविला पाहिजे. असे पवार म्हणाले.
यावेळी उमेदवार प्राजक्त तनपुरे, लहू कानडे, निर्मलाताई मालपाणी यांची यावेळी भाषणे झाली. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी शरद पवार यांचा सत्कार केला. यावेळी सभापती अरुण तनपुरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, मनीषा ओहोळ, अमृत धुमाळ, अजित कदम, सुरेश वाबळे, अरुण कडू, शब्बिर देशमुख आदी कार्यकर्ते हजर होते.

Leave A Reply

Your email address will not be published.