भीषण अपघातात कराडच्या युवकाचा मृत्यू

एक गंभीर; दुसऱ्या अपघातात पाचजण जखमी
नागठाणे – पुणे- बंगळुरू महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांत एकाचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास महामार्गावरून निघालेल्या मारुती सुझुकी रिट्‌झ कारचा पुढील टायर फुटल्याने कार जोरात पलटी होऊन भीषण अपघात झाला.

रामकृष्णनगर ते काशीळ दरम्यान काशीळ गावच्या हद्दीत आझाद पेट्रोल पंपासमोर कराड बाजूकडे जाणाऱ्या लेनवर झालेल्या या अपघातात कारचे चालक सागर पवार (वय 29, कराड) यांचा मृत्यू झाला. तर शेजारी बसलेले इंद्रजित धनंजय पवार (रा. वडोली, निळेश्‍वर, ता. कराड) हा युवक गंभीर जखमी झाला.

अपघातस्थळी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार शशिकांत कणसे, सूर्यकांत पवार, मनोहर सुर्वे, चालक धनंजय जाधव, हायवे बिटचे लालासाहेब ढाणे यांनी धाव घेत जखमीला उपचारासाठी सातारा येथे पाठवले. दरम्यान, मंगळवारी दुपारी महामार्गावरच बोरगाव गावच्या हद्दीत हॉटेल महाराजाजवळ कार व दुचाकी यांच्यात अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही वाहने महामार्गालगतच्या शेतात जाऊन पलटी झाली.

या अपघातात दुचाकीवरील शशिकांत भालगुराम पवार (वय 43, रा. उंब्रज) व कारमधील जयवंत हणमंत पाटील, हणमंत केशव पाटील, तारामती हणमंत पाटील, मनीषा जयवंत पाटील (सर्व रा. विहे, ता. पाटण) हे किरकोळ जखमी झाले. दोन्ही अपघातांची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)