कराडला वन्यप्राणी पुनर्वसन व संवर्धन केंद्र व्हावे

कोल्हापूरला पाच जिल्ह्यांतील वन्यजीव अभ्यासकांची बैठक संपन्न

कराड – महाराष्ट्रामध्ये जुन्नर खालोखाल कराड तालुक्‍यामध्ये मोठ्या प्रमाणावर बिबट्या आढळत असून इतर पाच ते सहा जिल्ह्यांतील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या कराड येथे वन्यप्राणी पुनर्वसन व संवर्धन केंद्राची गरज आहे. यासाठी कोल्हापूर वनविभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कराडचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केली.

पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या वन्यजीव अभ्यासक, निसर्गमित्र यांच्या वन्यप्राणी आपत्कालीन सेवा बैठकीत बोलत होते. यावेळी पाच जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्‍लेमेंट बेन यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्ग मित्र व वन्यजीव अभ्यासक उपस्थित होते.

मुख्य वनसंरक्षक बेन म्हणाले, वन्यजीवांचा ऱ्हास थांबवण्यासाठी, वन्य जीवांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी समाजातील निसर्गमित्र, वन्यजीव अभ्यासक असलेल्या विशिष्ट घटकांना या व्यवस्थेत शासनाच्या वतीने सहभागी करून देण्याच्या हेतूने प्रायोगिक तत्वावर कोल्हापूर वनवृत्तात हा उपक्रम राबण्यात येत आहे. या बाबतची प्राथमिक स्वरुपाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या स्वरुप व व्यवस्थापनासंदर्भात अनेक निसर्गमित्रांनी आपापली मते मांडली. या मतावर विचार विनिमय करून यापुढील काळात वन्य जीवांच्या सुरक्षेसाठी व संवर्धनासाठी या माध्यमातून ठोस पावले उचलण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

सांगलीचे मानद वन्यजीव रक्षक पापा पाटील यांनी प्रत्येक जिल्हा स्तरावर अशा बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या. तसेच विविध प्राणी वाचवण्यासाठी आलेल्या रेस्क्‍यू कॉल कसे हाताळावे व वन्यजीव कायदा याविषयी मार्गदर्शन केले. गारगोटी चे जंगल अभ्यासक सुभाष माने यांनी सर्पमित्रा पलीकडे जावून व्यापकपणे निसर्ग संवर्धन, प्रबोधनाची व्यापक मांडणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर कोल्हापूरचे राजेंद्र मकोटे यांनी सर्पमित्रांना किट उपलब्ध करून देण्याबरोबरच या निसर्गमित्रांना जंगल साक्षरता पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी केली.

बैठकीत व्यवस्थापकांना ड्रेसकोड, ओळखपत्र, मानधन, व्यवस्थापनाचे स्वरुप यावर चर्चा झाली. डिजिटल स्क्रिनच्या माध्यमातून या उपक्रमाचे स्वरुप विशद करण्यात आले. या बैठकीस कोल्हापूरचे जिल्हा वनसंरक्षक एस. व्ही. काटकर, रत्नागिरी जिल्हा वनसंरक्षक विजय सुर्वे, सांगली जिल्हा वनसंरक्षक पी. बी. धानके, सिंधुदुर्ग जिल्हा वनसंरक्षक समाधान चव्हाण, सातारा जिल्हा वनसंरक्षक भारतसिंह हाडा, मानद वन्यजीव रक्षक पापा पाटील, हेमंत केंजळे, किरण नाईक तसेच पाच जिल्ह्यातून आलेले शेकडो निसर्ग मित्र, अभ्यासक उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.