कराड (प्रतिनिधी) – कराड येथील कृष्णा नाका परिसरात वाघ व बिबट्याच्या नखांची विक्री करणाऱ्या दिनेश बाबूलालजी रावल (वय 38 रा. सोमवार पेठ, कराड) व अनुप अरुण रेवणकर (वय 36 रा. रविवार पेठ, कराड) या दोघांना वन विभागाकडून अटक करण्यात आली आहे. कराड शहरात भर बाजारपेठेत हा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.
गेल्या काही दिवसांपासून वन विभाग व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे अधिकारी संशयितांवर पाळत ठेवून होते. काल सोमवारी दि. 16 ऑगस्ट रोजी संशयित वाघ व बिबट्याच्या नखांची विक्री करण्याच्या तयारीत होते.
अशी माहिती मिळाल्यावर कृष्णा नाका येथे सावित्री कॉर्नर बिल्डिंगमध्ये असलेल्या सखी लेडीज शॉपी येथे संशयित दिनेश रावल दोन वाघनख्या घेऊन विक्रीसाठी आला. त्यावेळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला झडप घालून पकडले. त्याला ताब्यात घेऊन लगेचच दुसऱ्या संशयित अनुप अरुण रेवणकर याच्या रविवार पेठ येथील काझी वाड्याजवळ असलेल्या मयूर गोल्ड या दुकानात धाड टाकल्यावर त्याच्याजवळ 8 वाघ व बिबट्याच्या नख्या सापडल्या.
तसेच संशयिताच्या गळ्यात एक वाघ नख सापडले. अशी एकूण 13 नखे सापडली. या १३ नखांमध्ये वाघाची किती आणि बिबट्याची किती हे चाचणीनंतर समजू शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोघांनाही वन विभागाने अटक करून गुन्हा दाखल केला आहे.