Karad South Assembly Constituency । राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. राज्यातील जनतेने पुन्हा एकदा महायुतीला सत्तेत येण्याची संधी दिली आहे. त्यातच यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दारूण पराभव झाला आहे. भाजपाचे भाजपाचे डॉ. अतुलबाबा भोसले हे या मतदारसंघातून विजयी ठरले आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण हे यावेळी तिसऱ्यांदा कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. याआधी २०१४ आणि २०१९ साली त्यांनी निसटता विजय प्राप्त केला होता.
२०१९ साली भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांच्याविरोधात सहा हजारांच्या मताधिक्याने पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. तर २०१४ साली काँग्रेसचे बंडखोर नेते विलास पाटील-उंडाळकर यांचा चव्हाण यांच्याविरोधात १६ हजार मतांनी पराभव झाला होता.
यावेळी पाटील उंडाळकर आणि चव्हाण एकत्र आले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना विजयाची खात्री वाटत होती. परंतु, त्यांचा पराभव झाला आहे.