पुण्यातील ट्रकचोरास कराड पोलिसांनी पकडले 

कराड  –पुणे येथे ट्रक चोरून एकाने कराडच्या दिशेने पोबारा केल्याची घटना बुधवारी घडली होती. त्यानंतर सदर ट्रक चालक चोरीचा ट्रक घेऊन मसूरमार्गे कराडला येत असल्याबाबतची माहिती कराड पोलिसांना मिळाली. त्यानुसार येथील पोलिसांनी एसजीएम कॉलेज परिसरात माहिती घेत असताना सदर ट्रक मसूरकडून कराडच्या दिशेने येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला ट्रकसह ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले. यादरम्यान पोलीस ठाण्याच्या आवारात ट्रक पार्क करण्याच्या बहाण्याने चोरट्याने पोबारा करण्याचा प्रयत्न केला. विशाल बाबुराव गस्ते (वय 30) रा. यळगुड ता. हातकणंगले जि. कोल्हापूर याला पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी पुणे येथून एका चोरट्याने ट्रक चोरून पुणे-बेंगलोर महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने पोबारा केला होता. त्यानंतर सदर ट्रकचालक चोरीचा ट्रक घेऊन मसूरमार्गे कराडला येत असल्याबाबतची माहिती स.पो.नि. संभाजीराव गायकवाड यांना गुरुवारी पहाटे मिळाली.

त्यानंतर त्यांनी पो.कॉ. तानाजी शिंदे यांना एसजीएम कॉलेज परिसरात माहिती घेण्यासाठी पाठवले असता, सदर ट्रक मसूरकडून कराडच्या दिशेने येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे शिंदे यांनी या भागात मॉर्निग वॉकला आसलेल्या पो.ह. विवेक गोवारकर यांच्या मदतीने त्यांनी ट्रकचालकास कृष्णा कॅनॉल येथे थांबवून त्याच्याकडे ट्रक व अन्य गोष्टींची विचारणा केली असता ट्रकचालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ट्रकसह ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात आणले.

परंतु, यादरम्यान ट्रकचालक विशाल गस्ते याने पो.कॉ. तानाजी शिंदे यांना पोलीस ठाण्याच्या आवारात ट्रक पार्क करण्याची सबब देऊन त्यांची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याठिकाणी उभे असलेले पो.कॉ. रवींद्र देशमुख यांना चोरटा पळून जात असल्याचे दिसून आले. ही बाब त्यांनी पो.कॉ. तानाजी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली असता पो.कॉ. तानाजी शिंदे व पो.कॉ. रवींद्र देशमुख यांनी चोरट्याचा पाठलाग करून त्याला कराड येथील रणजीत टॉवर जवळच्या सार्वजनिक शौचालया जवळ पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)