कराड, पाटण तालुका पावसाने चिंब

कराड –जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने गेले चार दिवसांपासून जोरदार बरसण्यास सुरुवात केली आहे. कराड व पाटण तालुक्‍यात मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. चार दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे नदी, ओढे, तलाव यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

या पावसाने कोयना धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तर ढेबेवाडीतील वांग-मराठवाडी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. एकंदरीत चार-पाच दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे कराड व पाटण तालुका चिंब झाला आहे. दरम्यान पाटण तालुक्‍यातील काढणे याठिकाणचा पूल दोन दिवसापासून पाण्याखाली असल्याने चार गावच्या नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.

यंदा पाऊस सरासरी गाठेल, असा अंदाज मे महिन्यामध्ये हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र राज्यात पावसाचे आगमन उशिरा झाले. जून महिन्यात चार-आठ दिवस पाऊस पडला. त्यानंतर हळूहळू पावसाने पाठ फिरवण्यास सुरुवात केली. जुलै महिना कोरडा ठणठणीत निघाला असतानाच पावसाची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिक वाया जाण्याच्या मार्गावर होते. पाऊस पडावा यासाठी शेतकरी पावसासाठी साकडे घालू लागला होता. अखेर गेल्या चार दिवसापासून कराड व पाटण तालुक्‍यात जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिक वाचले आहेत.

या पावसामुळे वर्षा सहलीवर जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. डोंगरातून कोसळणारे धबधबे, नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ, हिरवेगार नटलेले डोंगर पाहण्यासाठी वर्षा प्रेमींची संख्या वाढत आहे. पाटण तालुक्‍यातील कोयना व नवजा भागात पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करू लागले आहेत. तसेच धारेश्वर दिवशी, सडावाघापूरचा उलटा धबधबा पाहण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांचीही संख्या दिवसेंदिवस वाढू लागली असल्याचे दिसून येत आहे.

पाटण तालुक्‍यातील धरणे तुडुंब
पाटण तालुक्‍यातील ढेबेवाडी विभागातील मराठवाडी, मराठवाडी, महिंद, बिबी, साखरी, चिटेघर, उत्तरमांड, तारळी, चाळकेवाडी येथील छोटी-मोठी धरणे दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे तुडुंब भरली आहेत. मान्सूनला यावेळी उशिरा सुरुवात झाल्याने यंदा धरणे भरणार की नाही, या चिंतेत शेतकरी वर्ग असतानाच, काही दिवसापासून जोरदार पावसाने येथे हजेरी लावल्याने ही धरणे पूर्णपणे भरली आहे. याच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. धरणे भरल्याने येथील क्षेत्रातील शेतकऱ्यांना खरीप हंगामाबरोबर रब्बी व ऊस पिकाला या पाण्याचा फायदा होणार आहे. तसेच उन्हाळ्यात या धरणातील पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याची होणारी गैरसोय मिटण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कृष्णा-कोयनेच्या पाणीपातळीत वाढ
कराड तालुक्‍यापेक्षा पाटण तालुक्‍यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाने कोयनासह नवजा येथे आतापर्यतच्या पावसाचे रेकॉर्ड ब्रेक केले आहे. एवढा विक्रमी पाऊस याठिकाणी झाल्याने कोयना धरणात चोवीस तासात पाच ते सात टीएमसी पाण्याची वाढ झाली. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळी झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणामधील पाणीसाठ्यात 65. 65 टीएमसी एवढी वाढ झाली आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर असाच राहिला तर धरण भरण्यास वेळ लागणार नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.