कराड, पाटणला पावसाने झोडपले

कोरीवळेत 25 घरांचे पत्रे उडाल्याने लाखोंचे नुकसान
माजगावला झाड पडल्याने दोन तास वाहतूक ठप्प

चाफळ/उंब्रज – उंब्रज व चाफळसह परिसरात गुरुवारी प्रचंड वारा व गारांसह झालेल्या मुसळधार पावसाने सर्वांचीच दैना उडाली. कराड तालुक्‍यातील कोरीवळे येथे वादळी वाऱ्याने तीस घरावरील पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतातील जनावरांचे शेड, गंजी आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर नजीकच्या साबळवाडी गावाजवळ विजेच्या खांबावर बाभळीचे झाड पडल्याने विजेचा खांब मोडून विजेच्या तारा तुटल्याने साबळवाडीसह कोरीवळे गावचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. तर चाफळ परिसरातील माजगाव गारांच्या पावसाबरोबरच वादळी वाऱ्याने रस्त्यावर भले मोठे बाभळीचे झाड कोसळल्याने सुमारे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. कराड शहरात मात्र पावसाचा शिडकावा झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता.

गेले दोन दिवस उष्णतेत प्रचंड वाढ झाली होती. या उन्हाने सर्वजण हैराण झाले होते. सकाळी आठ वाजल्यापासूनच उन्हाचे चटके बसत असल्याने घराबाहेर पडणे अनेकांनी टाळले होते. त्यामुळे बाजारपेठेतही शुकशुकाट जाणवत होता. गुरूवारी सायंकाळी पाचनंतर अचानक वादळी वारे सुटून पावसास सुरूवात झाली. कराड शहरात नुसताच पावसाचा शिडकावा झाला त्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र कराड तालुक्‍यातील साबळवाडी, कोरीवळे गावाला सुमारे एक तास झालेल्या अवकाळी पावसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसाबरोबरच वादळी वाऱ्यानेही हजेरी लावल्याने गावातील सुमारे तीस घरावरील पत्रे वाऱ्याने उडून गेली आहेत.

घरावरील पत्रे उडून गेल्याने घरातील कपडे, धान्य यासह जीवनाशक्‍य वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. तर शेतात असणारी जनावरांची शेड व वैरणीच्या गंजी वाऱ्याने उडून गेल्याने आहेत. यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या वादळी वाऱ्याने रमेश निगडे, राजेंद्र निगडे, संपत निगडे, तानाजी निगडे, हणमंत निगडे, विकास हत्ते या सहा जणांच्या एकत्रित घरावरील संपूर्ण पत्रा या वादळी वाऱ्यात उडून गेला. तर सोमनाथ धनाजी मोहिते, बबन मोहिते, संदीप मोहिते, विनायक मोहिते, हिंदुराव मोहिते, बाळासो मोहिते, उद्धव मोहिते , प्रदीप शंकर मोहिते, प्रभाकर मोहिते, संजय मोहिते, काकासो मोहिते, बबई काटे, आनंदा पवार, संपत मोहिते, संतोष निगडे, आनंदराव निगडे, संतोष नलवडे, शिवाजी निगडे, बाळासो सुतार, संभाजी मोहिते, मारुती मसुगडे, राजेंद्र मोहिते यांच्या घरावरील पत्रे उडून जावून मोठे नुकसान झाले. चाफळसह परिसरात अचानकपणे प्रचंड वारा व गारांसह सुरु झालेल्या मुसळधार पावसाने ठिकठिकाणी नुकसान केले आहे.

श्रीराममंदिर परिसरात लावलेले मार्गदर्शक फलकासह इमारतीचेही मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे श्री समर्थ विद्यालयाचा पत्रा उडून जाऊन नजीकच्या शेतात जाऊन पडला. शिवारात अनेक झाडांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. गुरुवारी चाफळचा आठवडी बाजार असतो. अचानकपणे गारा व वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे व्यावसायिकांची व नागरिकांची चांगलीच दैना उडाली. या पावसाने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. चाफळ-माजगाव रस्त्यावरील माजगाव गावच्या हद्दीत असलेले भले मोठे बाभळीचे झाड मुख्य रस्त्यावरच कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. चाफळ पोलीस दुरक्षेत्राचे अंमलदार गणेश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना केल्याने वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.