कराड – रविवारपासून कराडला महापुराचा वेढा पडला होता. गुरुवारपासून हा वेढा काही प्रमाणात कमी झाला. मात्र आज शुक्रवारी कराडमधील नद्यांचे पुर बऱ्यापैकी ओसरल्याने शहरातील जनजीवन सुरळीत झाले आहे. शहरातील व्यवहार पूर्वपदावर येऊ लागले आहे. रात्रीपासून नद्यांची पातळी मोठ्या प्रमाणात ओसरल्याने अनेक घरेही पाण्यातून बाहेर आली. पुराचे पाणी ओसरल्यावर स्थलांतरित झालेल्या पूरग्रस्तांनी त्यांच्या घराचीही स्वच्छता करण्यास सुरुवात केली होती. शहरात साचलेला गाळ काढून वेगवेगळ्या ठिकाणी स्वच्छता मोहीम हाती घेतली. शहरातील व्यवहार पूर्वपदावर आले होते, त्याचबरोबर तालुक्यातीलही वाहतूकही सुरळीत झाली होती.
कराड शहरासह तालुक्यात सातत्याने तीन दिवस पूरस्थिती निर्माण झाली होती. तालुक्यातील नदीवरील पूल, बंधारे पाण्याखाली गेले होते. पुराचे पाणी कमी झाल्यामुळे पाण्याखाली गेले पूल मोकळे झाले आहेत. येथील जुना कृष्णा पुलावर बॅरिकेट्स पुराच्या पाण्यामुळे तुटले असून याचे मोठे नुकसान झाले. शहरातील मुख्य व्यापारपेठ ही पाण्यात होती. त्यामुळे व्यवहार ठप्प झाले होते. शहरातील दत्त चौकासह मोठा नागरी भाग व बाजारपेठेतही पाणी साचून राहिले होते. शहराला येणाऱ्या अनेक रस्ते पाण्यात होते. त्यामुळे शहराशी संपर्क तुटला होता. तीन दिवस अनेक जीवनावश्यक वस्तूही येथे येवू शकल्या नव्हत्या. दूध, भाजीपाल्यासह इंधनाचाही तुटवडा जाणवत होता. पेट्रोल, डिझेल ही कुठे मिळत नव्हते. त्यामुळे सामान्य लोकांचे हाल होत होते. मात्र गुरुवारी सकाळपासून हळूहळू पूर्वपदावर येणारी बाजारपेठ आज सुरळीत सुरू झाली.
बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तू मिळू लागल्या होत्या. अनेक दुकान गाळ्यात साचलेले पाणी मोटारीने कालपर्यंत बाहेर काढण्यात येत होते. ते ही गाळे आज सुरू झाले होते. गोदामातही माल ठेवण्याची लगबग दिसत होती. नद्यांची पातळी अत्यंत खालावल्याने बाजारपेठेतील जनजीवन सुरळीत झाले होते. पुराच्या पाण्यामुळे नदीकाठी नागरी वस्तीत पाणी भरले होते. मात्र आज तेथील पूर्ण पाणी निवळल्याने पाटण कॉलनी, पायऱ्याखाली भाग, कुंभार पाणंदसह मंगळवार पेठेतील नागरी भाग मोकला झाला होता. अनेक घरेही पाण्यातून मुक्त झाली होती. तेथे लोकांकडून स्वच्छता करण्याची लगबग दिसत होती.
उद्या सायंकाळपर्यंत सर्वच स्थलांतरीत लोक पुन्हा आपआपल्या घराकडे परततील अशी स्थिती आहे. नगरपालिकेनेही मोकळ्या झालेल्या भागाची आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिम हाती घेतली. येथील प्रितीसंगम बाग व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी परिसरात स्वच्छता करण्यात आली. नगराध्यक्ष सौ. रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, विजय वाटेगावकर यांच्यासह बहुतांशी नगरसेवकांनी त्यात सहभाग घेतला होता. त्या स्वच्छतेसह शहरातही अनेक ठिकाणी लोकांनी स्वतः स्वच्छता राबवली होती.
कराड शहराला चार दिवसापासून पुराचा वेढा पडला होता. दोन दिवसापासून येथे राजकीय नेत्यांची वर्दळ वाढली आहे. गुरुवारी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी कराडला भेट दिली. आज शुक्रवारी सकाळी दहा वाजता ना. सुभाष देशमुख यांनी येथील शाळा नंबर 3 मध्ये जाऊन स्थलांतरित पूरग्रस्तांची विचारपूस केली.
त्यानंतर दत्त चौक व प्रीतीसंगमावर जाऊन त्यांनी पुराची पाहणी केली. पूरस्थिती नंतर घ्यावयाच्या काळजीबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या. सकाळी अकरा वाजता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कराडला भेट देत पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर दुपारी बारा वाजता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी कराड मधील पूरपरिस्थिती पाहणी करून त्याचा आढावा घेतला.