कराड नगरपालिका चालणार सौर ऊर्जेवर

प्रशासकीय इमारतीवर 10 किलो वॅटचा प्रकल्प कार्यान्वित

प्रति महिन्याचे 50 हजारांचे बील वाचणार

सौर ऊर्जा प्रकल्प महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणने 100 टक्के अनुदानावर पालिकेस दिला आहे. नगरपालिकेच्या नव्या व जुन्या इमारतीत सद्यस्थितीत 100 टयुब लाईट, 59 पंखे, 100 सीएफएल बल्ब, 24 कॉम्प्युटर, 3 टीव्ही, हायमास्ट, सीसीटीव्ही अशी यंत्रणा आहे. याच्या वीज वापराचे महिन्याला 50 हजार रुपयांचे बिल येत होते, ते वाचणार आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होणार आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून महावितरणची वीज वापरणार असल्याचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी सांगितले. 

कराड – शहरातील सर्व पथदिवे बदलून एलईडी बसवून नगरपालिकेने वर्षाला सुमारे पाऊण कोटींची बचत सुरु केली आहे. आता अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देत कराड नगरपालिकेने प्रशासकीय इमारतीवर सौर ऊर्जा सयंत्रे बसवली आहेत. त्यामुळे नगरपालिकेतील सर्व इलेक्‍ट्रीक उपकरणे सौर ऊर्जेवर चालणार असून आणखी वीज बचत होणार असल्याची माहिती नियोजन सभापती विजय वाटेगावकर यांनी दिली.

पालिका इमारतीवर बसवलेल्या सयंत्रांचा शुभारंभ गुरुवारी करण्यात आला. बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती गजेंद्र कांबळे, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, बाळासाहेब यादव, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, राजेंद्र माने, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे, विद्या पावसकर, सुहास जगताप, फारुक पटवेकर, मुख्याधिकारी यशवंत डांगे, नगरअभियंता एम. एच. पाटील, विद्युत पर्यवेक्षक धन्वंतरी साळुंखे आदी उपस्थित होते.

राज्य शासनाकडून सातारा जिल्हयात सर्वप्रथम कराड नगरपालिकेस 100 टक्के अनुदानातून हा सौर ऊर्जा प्रकल्प देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पालिकेच्या जुन्या व नव्या इमारतीचे सुमारे 40 ते 50 हजार रुपयांचे वीज बिल वाचण्यास मदत होणार आहे.

शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये होणारा वीज वापर कमी करण्यासाठी राज्य शासनाने सन 2013 साली अपारंपरिक ऊर्जेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालये, जिल्हा परिषदांच्या इमारतींवर सौर ऊर्जा संच बसवण्याची योजना आखली होती. विशेष म्हणजे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणतर्फे 100 टक्के अनुदानावर हा प्रकल्प देण्यात आला आहे. नगरपालिकेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी ठराव करुन शासनास पत्र दिले होते. त्यानुसार गेल्या डिसेंबर महिन्यात पालिकेस हा प्रकल्प देण्यात आला. तो बसवण्याचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. गुरूवार, दि. 25 रोजी याचा शुभारंभ करण्यात आला.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, मुख्याधिकारी यशवंत डांगे, विद्युत पर्यवेक्षक धन्वंतरी साळुंखे यांनी शासनाकडे या प्रकल्पासाठी सततचा पाठपुरावा केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात प्रथम कराड पालिकेस हा प्रकल्प मिळाला असून दहा किलो वॅटच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून पालिकेतील सर्व दिवे यावर चालणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रति महिना वाचणाऱ्या सुमारे 50 हजार रूपयांच्या वीज बिलाच्या रक्कमेचा पालिकेच्या उत्पन्न वाढीत समावेश होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)