कराड (प्रतिनिधी) – “स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी देशात प्रथम येण्याचा बहुमान कराड नगरपालिकेने पटकावला. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी नवी दिल्लीत या वर्षीच्या निकालाची घोषणा केली. ही घोषणा होताच कराड पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. अनेकांनी आपल्या व्हॉटस्ऍप स्टेटसवर पालिकेचा गौरव करणारे व्हिडिओ ठेवून आनंद व्यक्त केला.
करोनामुळे यंदा व्हर्च्युअल पद्धतीने पारितोषिक वितरण झाले. नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी मुंबईत हा पुरस्कार स्वीकारला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ना. प्राजक्त तनपुरे, प्रधान सचिव महेश पाठक, नगरविकास विभागाच्या तत्कालीन सचिव मनीषा म्हैसकर उपस्थित होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमास देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक नगरपालिका, महापालिका व ग्रामपंचायतीनी यात भाग घेतल्याने सर्वत्र स्वच्छतेचे वारे वाहू लागले आहे. गतवर्षी एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये कराडने पहिले पारितोषिक मिळवले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविण्यासाठी डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम कराडमध्ये राबविण्यात आले.
शंभर टक्के कचरा संकलन, विलगीकरण व प्रक्रियेत पालिका यशस्वी झाल्याने कचरामुक्त शहराचे “थ्री स्टार’ मानांकन मिळाले. संपूर्ण शहरात भूमिगत गटारे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा शेतीसाठी पुनर्वापर, आधुनिक सार्वजनिक शौचालये, एक हजार घरांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया, बारा डबरी येथे जुना कचरा हटवून उभारलेले स्वच्छता प्रेरणा उद्यान अशा पातळ्यांवर पालिकेने यश मिळवले आहे.गेल्या पाच महिन्यांपासून जगाला करोनाने हादरवले असल्याने यंदा स्वच्छ सर्वेक्षणचा निकाल लांबणीवर पडला होता. रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, यशवंत डांगे, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालिका प्रथम येणार, असा विश्वास होता. गुणांकन यादीत पालिकेचा समावेश झाल्याने सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
दिल्लीतील कार्यक्रम सर्वांना पाहता यावा म्हणून पालिकेने गुरुवारी यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात थेट प्रक्षेपणचे नियोजन केले होते. पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम पाहिला. कराड पालिकेला पारितोषिक जाहीर होताच सर्वांनी जल्लोष केला. सलग दुसऱ्यांदा कराड पालिकेने यश मिळवल्याने सर्वांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. स्पर्धेसाठी रात्रंदिवस झटणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांनी सन्मान केला. नियोजन समितीचे सभापती विजय वाटेगावकर, स्मिता हुलवान, मोहसीन आंबेकरी, किरण पाटील, राजेंद्र माने, ए. आर. पवार, आर. डी. भालदार उपस्थित होते. दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली आहे. देशात प्रथम क्रमांकावर कराड असून सासवड दुसऱ्या तर लोणावळा नगरपरिषद तिसऱ्या क्रमांकावर आहे. एक लाखावरील लोकसंख्येच्या शहरात इंदूर (मध्य प्रदेश) महापालिकेने सलग चौथ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला. सूरत (गुजरात) शहराने दुसरा तर नवी मुंबई (महाराष्ट्र) महापालिकेने तिसरा क्रमांक पटकावला आहे.