कराडला दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळाले गटशिक्षणाधिकारी

कराड  – येथील पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारीपदी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांची निवड झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्या कराड पंचायत समितीत रूजू होणार आहेत. त्यांच्या रूपाने गत दोन वर्षांपासून रिक्‍त असणारे कराड पंचायत समितीमधील गटशिक्षण अधिकारी पदाची जागा भरून निघणार असून एक हुशार व अनुभवी व्यक्‍ती मिळाल्याने शिक्षण विभागातही मोठे बदल होण्याची शक्‍यता असल्याच्या प्रतिक्रिया तालुक्‍यातून व्यक्‍त होत आहेत.

शबनम मुजावर यांनी सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्राचार्य म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे त्यांची माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी पदी निवड करण्यात आली होती. गत तीन वर्षे उत्कृष्टपणे त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्‍यांमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या जागा रिक्‍त होत्या. त्यामध्ये खटाव व कराडसाठी पदे भरण्यात आली असून अजून चार ठिकाणी पदे रिक्‍त आहेत.

कराड तालुक्‍यात गत दोन वर्षांपासून हे पद रिक्‍त होते. माजी गटशिक्षणाधिकारी विश्‍वनाथ गायकवाड यांच्या सेवानिवृत्तीनंतर काही काळ विस्तार अधिकारी जमिला मुलाणी यांनी गटशिक्षणाधिकारी पदाची धुरा सांभाळली. मात्र जिल्हा परिषदेने विस्तार अधिकाऱ्यांचीही पदे रिक्‍त असल्याने साहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची या पदावर नियुक्‍ती केली. वास्तविक पाहता शिक्षण विभाग सांभाळणारी व्यक्‍ती ही त्याच क्षेत्रातील असणे गरजेचे असते. त्यामुळे शिक्षक संघटनांनी या पदांना विरोध केला. तरीही काही काळ उषा साळुंखे यांनी काम पाहिले. त्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार विस्तार अधिकारी चंद्रकांत निकम हे गेली काही महिने गटशिक्षणाधिकारी पदाची धुरा सांभाळत होते.

नुकताच जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील रिक्‍त असणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या जागा भरण्याचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यात सहा पदे रिक्‍त असल्याने प्रामुख्याने कराड व खटाव ही पदे भरण्यात आली. कराडच्या गटशिक्षणाधिकारी पदासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या उपशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांची नियुक्ती झाली असून येत्या दोन दिवसांत त्या रूजू होणार आहेत. आजपर्यंतचे गटशिक्षणाधिकारी हे तालुक्‍यातील शिक्षकांच्या संपर्कातील होते. मात्र मुजावर यांच्याशी त्यांचा फारसा संपर्क नसला तरीही त्यांनी माध्यमिक विभागाची जिल्ह्याची जबाबदारी सांभाळल्याने त्यांच्या अनुभवाचा तालुक्‍यातील शिक्षण विभागाच्या प्रगतीसाठी नक्कीच फायदा होईल अशी आशा शिक्षक संघटना व शिक्षण विभागातून व्यक्‍त होत आहेत.

आनंद पळसे यांची महाबळेश्‍वर गटशिक्षणाधिकारीपदी निवड

कराड पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागातील उपक्रमशील शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या आनंद पळसे यांची महाबळेश्‍वर पंचायत समितीमध्ये बदली झाली आहे. या तालुक्‍याच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा चार्जही त्यांच्याकडे आला आहे. कराड तालुक्‍यात गत दहा वर्षांपासून त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल विविध शिक्षक संघटनांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.