कराडमध्ये झाडांवर पक्षी, प्राण्यांची चित्रे

प्राणी, पक्षी यांची चित्रे काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

कराड – कराड नगरपालिकेची स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठी जय्यत तयारी सुरू आहे. शहरातील स्वच्छतेबरोबरच शहर सुंदर दिसण्याकडे जास्त भर दिला आहे. यासाठी वार्ड सुशोभीकरण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर सौंदर्याची झलक अनुभवायला मिळण्यासाठी शहरातील झाडांवर प्राणी, पक्षी यांची चित्रे काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर आत्तापर्यंत 50 वृक्षांवर चित्रे काढण्यात आली असून किमान 80 ते 85 वृक्षांवर चित्रे काढण्यात येणार आहेत. या चित्रांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडत असून जनजागृती होत आहे.

नगरपालिकेने 2019 मध्ये एक लाख लोकसंख्या खालील शहरांमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला. त्यानंतर 2020 मध्ये सलग दुसर्‍यांदा प्रथम क्रमांकाच्या यशानंतर नगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षण 2021 च्या तयारीसाठी कंबर कसली आहे. तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. त्यादृष्टीने स्वच्छता, सुशोभीकरण आदींचे नियोजन पालिकेतील आरोग्य विभागासह पालिकेचे सर्वच विभाग यासाठी काम करत आहेत. शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये सुशोभीकरण करण्यात आले आहे. वार्डच्या प्रत्येक चौकात कारंजे उभारण्यात आले आहेत. स्पर्धेच्या निकषांचे पालन करत पालिकेने पुन्हा कराड प्रथम क्रमांक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

पालिकेने शहरात मोठ्या वृक्षांची जोपासना केल्यामुळे आज शहर ग्रीन सिटी बनले आहे. शहरामध्ये कोल्हापूर नाका ते कृष्णा नाकापर्यंत अनेक मोठे वृक्ष आहेत. टाऊन हॉलपासून ते कृष्णा पुलापर्यंत वृक्षांची संख्या जास्त प्रमाणात आहे. यामुळे या मुख्य रस्त्यांवर नेहमी गारवा राहतो. हे वृक्ष सावली देण्याबरोबरच विविध चित्रांनी रेखाटल्याने जनजागृतीचे काम करत आहे.

त्यासाठी नगरपालिकेने कचरा, सांडपाणी व्यवस्थापन, टाकाऊपासून टिकाऊ शिल्प तयार करणे, डिव्हाईडरचे रंगकाम, वृक्ष संवर्धन यांसारख्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातूनच शहरातील मुख्य रस्त्यांवरील वृक्षांवर पक्षी, प्राणी यांच्या कलाकृती रेखाटून पर्यावरण संवर्धन आणि जनजागृती केली जात आहे. त्यातून शहरातील रस्त्यांचे रूपडे पालटले आहे.

गेल्या दोन महिन्यापासून शहरातील झाडांवर चित्र काढण्याचे काम सुरू आहे. शशिकांत हापसे यांच्या उत्तरा आर्ट्सचे गणेश खवळे, प्रकाश सोनवणे, चेतन कुंभार, नाज, महेश पवार, राहुल होवळ या कलाकारांनी कलाकृती साकारली आहे. झाडे रंगवून त्यावर पक्षी, प्राणी, त्याचबरोबर कोरोना महामारीशी सुरू असणारा लढा विविध चित्रांतून रेखाटला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.