कराड – मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. येथील वाखाण भागात जगताप वस्तीवर सोमवारी दि. 27 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
मोकाट कुत्र्यांनी घरासमोरील अंगणात असणाऱ्या चिमुकल्यावर झडप घालून त्याला फरपटत ऊसात नेले. परिसरातील नागरिकांनी केलेल्या तासाभराच्या शोध मोहिमेनंतर मुलाचा मृतदेह शेतात आढळून आला. राजवीर राहुल ओव्हाळ (रा. जगताप वस्ती, वाखाण, कराड) असे हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कराडमधील वाखाण भागात असलेल्या जगताप वस्तीवर राहुल ओव्हाळ, पत्नी वैशाली, तीन मुली व मुलगा राजवीर यांच्यासह वास्तव्यास आहेत. राहुल ट्रॅक्टरचालक असून सोमवारी दुपारी ते ट्रॅक्टर घेऊन कामावर गेले होते.
तर वैशाली या घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात भांगलण करीत होत्या. राजवीर त्याच्या बहिणींसह घराच्या अंगणात खेळत होता. काही वेळानंतर राजवीर कुठेच दिसत नसल्याचे बहिणींच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी याबाबत आईला सांगीतले. त्यानंतर वैशाली यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. राहुलही तातडीने घरी आले. सर्वांनी शोध घेतला असता नजीकच असलेल्या ऊसाच्या शेतात भटक्या कुत्र्यांच्या झुंडीमध्ये राजवीर पडला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. राहुल यांच्यासह शेतकऱ्यांनी मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावत त्याठिकाणी धाव घेतली. राजवीरच्या गळ्यासह पाय आणि हाताचे श्वानांनी लचके तोडले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात हलवले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.