पुणेः राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणावर वातावरण तापलेलं आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या वाल्मीक कराडवर मकोका लावल्यानंतर परळी शहरात कराड समर्थकांकडून आंदोलन करण्यात आले. तसेच एक महिला आणि एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला. यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरी देखील देशमुख आणि कराड समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकरणावर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
देसाईंकडून आश्रमाचा उल्लेख
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्री धनंजय मुंडे यांचे मित्र असून अनेक वेळा देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या मैत्री खातर करुणा मुंडे यांना अनेक विमानाने माहेरी सोडले असल्याचा दावा तृप्ती देसाई यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत केला आहे. तसेच त्यांनी कराडवर देखील जोरदार टीका केली. खंडणीच्या प्रकरणात कराड याचा शोध पोलीस घेत होते, तेव्हा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील अण्णासाहेब मोरे म्हणजे गुरु माऊली यांच्या आश्रमात १५ ते १६ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे मुक्कामाला होते, असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे तेथील प्रमुख आहे त्याच्यावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न देसाई यांनी उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे.
तपास यंत्रेणेवर प्रश्न आणि सवाल
या घटनेचा तपास व्यवस्थित होत नाही. प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआयडी पथक नेमावे लागते, मध्येच एसआयटी पथक नेमले जाते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या काही अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात येते. काही अधिकाऱ्यांची बदली केली जाते. यामुळे राज्यात चाललय तरी काय असे म्हणत तपासावर देसाई यांनी सवाल उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही. याचाच अर्थ धनंजय मुंडे यांच्या मागे गृहमंत्री आहेत आणि त्यांची पाठराखण करत आहेत हे स्पष्ट होत असल्याचे देखील देसाई म्हणाल्या.
त्यावेळी करुणा मुंडेंनी तक्रार केली होती.
करुणा मुंडे यांनी तृप्ती देसाई यांच्याकडे तक्रार केली होती, असे देसाई यांनी सांगितले आहे. मी इंदोरला माझ्या घरी माहेरी जायचे. तेव्हा कधी-कधी विमानातून माहेरी सोडायला धनंजय मुंडे यांचे मित्र फडणवीस आलेले होते, असे देसाई यांनी सांगितले. यामुळे तपास कसा सरळ मार्गे होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.