कराड – जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कराड विमानतळावर नाईट लॅंडिंगसह अन्य सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. हे विमानतळ सध्या एमएडीसीकडे असून त्यांच्या विकासासाठी ते एमआयसीकडे सुपूर्द करून इतरही आवश्यक मदत करू. तसेच सातारा जिल्ह्यात 500 एकरमध्ये ऍग्रो इंडस्ट्री पार्क उभारण्यात येणार असून जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्रासाठी 10 कोटी रुपयांचा निधीही देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, आ. महेश शिंदे, आ. शहाजीबापू पाटील उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “”बोलतो, बघतो, करतो असे म्हणणारा मुख्यमंत्री मी नाही. लोकहितासाठी जे काही करणे शक्य आहे, ते होणार असल्याचे जाहीरपणे सांगून टाकतो. त्यानंतर कधीही मागेपुढे पाहत नसून विकास कामांमध्ये कसल्याही प्रकारचा दुजाभाव करत नाही. आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार असून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यावर आमचा भर आहे. त्यामध्ये जलसिंचन प्रकल्पाला प्राधान्य देत असून प्रलंबित प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यताही देत आहोत. त्यामुळे लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.”
कमी कालावधीत आमच्या सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले. त्यामुळे लोकांचाही आम्हाला मोठा पाठींबा मिळत असून ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीने अकराशे जागांपैकी सातशे जागा मिळवल्या आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेतही आमची युती कायम राहणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सीमावादाबाबत बोलणाऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही : शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; जिल्ह्यात ऍग्रो इंडस्ट्री पार्कसह कृषी संशोधन केंद्रासाठी दहा कोटी
महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद आमच्या अस्मितेचा प्रश्न असून एकही गाव इकडून तिकडे जाणार नाही, ही जबाबदारी आमची आहे. याबाबत आता जे बोलत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे म्हणाले, “शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. महाराजांचा अपमान किंवा तुलना कोणीही करू शकत नाही. राज्यपालांच्या वक्तव्यावर मी याआधीही बोललो असून कुणाच्याही अशा प्रकारच्या विचारांशी आम्ही सहमत नाही.’ लपूनछपून आम्ही कोणतीही भूमिका घेत नसून ती उघडपणे घेतो, असेही त्यांनी सांगितले.