Karad Accident : शहरासह परिसरासाठी बुधवार हा अपघाताचा वार ठरला. बुधवारी दिवसभरात चार वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले. पुणे- बंगळूर महामार्गावर खोडशीनजीक बुधवारी सकाळी खड्ड्यात अॅपेरिक्षा आपटल्याने हजारमाची येथील समीर मुल्ला हा चालक गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कराड शहरातील अपघातात सुषमा आनंदा किर्तने (वय ५४, रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड) या प्राध्यापिकेचा मृत्यू झाला. सुषमा किर्तने या विद्यानगर येथील यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजमध्ये वनस्पतीशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या. महाविद्यालय सुटल्यानंतर त्या कराड बसस्थानकाच्या दिशेने जात होत्या. त्यावेळी कृष्णा नाका बाजूकडून विजय दिवस चौकाकडे दगड घेऊन जाणाऱ्या डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये प्रा. सुषमा कीर्तने यांचा मृत्यू झाला. सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास एका दुचाकीने दोघांना धडक दिली. या धडकेत दोघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मलकापूर येथील कोयना वसाहत मंडईत भरधाव कारने चिरडल्यामुळे भाजी विक्रेत्या उषा बाळू रौंदाळे (वय ४७, रा. मलकापूर ) यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन महिला जखमी झाल्या. बुधवारी रात्री साडेसातच्या दरम्यान भरधाव वेगात आलेल्या कारने एका दुचाकीला धडक देत भाजी विकण्यासाठी बसलेल्या उषा रौंदाळे या महिलेला चिरडले. त्यानंतर ही कार रस्त्यालगत असणाऱ्या बोर्डला धडक देत कठड्यावर जाऊन अडकली. ही कार महिला चालवत होती, असे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले. अपघातात जखमी झालेल्या अन्य तीन महिलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.