लखनौ – कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आज अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीला समाजवादी पक्षाने पाठिंबा दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की मी 16 मे रोजीच कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला असून आपण आता ज्येष्ठ कॉंग्रेस नेते राहिलेलो नाही. मी अपक्ष म्हणून राज्यसभेचा अर्ज भरला आहे. माझ्या उमेदवारीला समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांनी पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
सिब्बल यांची राज्यसभेची मुदत संपल्याने त्यांना कॉंग्रेस कडून पुन्हा उमेदवारी देण्याविषयी कोणताही शब्द पक्षाने त्यांना दिला नव्हता. त्यामुळे हवालदिल झालेल्या सिब्बल यांनी समाजवादी पक्षाशी हातमिळवणी करून राज्यसभेची जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी थेट समाजवादी पक्षात प्रवेश केलेला नाही पण त्यांना त्या पक्षाने राज्यसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केल्याने त्यांची राज्यसभेवरील निवड निश्चीत असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान त्यांनी पक्ष सोडताना कॉंग्रेसच्या नेतृत्वावर टीका करणे टाळले आहे. तथापि त्यांनी या आधी पक्षाच्या कार्यपद्तीवर काही प्रश्न उपस्थित केले होते. तेव्हापासूनच ते पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट झाले होते, त्यातच त्यांना पुन्हा राज्यसभा उमेदवारी मिळण्याची आशा मावळल्याने त्यांनी बाहेरचा रस्ता धरला असे सांगण्यात येते.