मेलबर्न – क्रिकेटवेड्या ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेटपटूंसह विविध देशांच्या क्रिकेटपटूंचा एका अविश्वसनीय पद्धतीने गौरव करण्यात आला आहे. कपिल देव, सचिन तेंडुलकर व विराट कोहली यांच्यासह जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंची नावे येथील रस्त्यांना देण्यात आली आहेत.
1983 साली भारतीय संघाला विश्वकरंडक जिंकून देण्याता मोलाचा वाटा उचलणाऱ्या कपिलदेव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांच्या नावाने आता येथील प्रमुख रस्ते ओळखले जाणार आहेत.
जगभरात क्रिकेट खेळले जात असलेल्या देशांत सर्वात जास्त भारतीय क्रिकेटपटू प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कामगिरीचा गौरव म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच येत्या नोव्हेंबरमध्ये भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून त्यावेळी त्यांचा खास सत्कारही करण्यात येणार आहे. रॉकबॅंक या परगण्यात तेंडुलकर ड्राइव्ह, कोहली क्रिसेंट, वॉ स्ट्रीट, देव टेरेस, कॅलिस वे अशी नावे देण्यात आली आहेत.
भारतीय व ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबरच पाकिस्तानचा वसीम अक्रम, न्यूझीलंडचा रिचर्ड हॅडली, वेस्ट इंडिजचे सर गारफिल्ड सोबर्स यांचीही नावे रस्त्यांना देण्यात आली आहेत.