नवी दिल्ली -भारताचे महान वेगवान गोलंदाज विश्वकरंडक विजेते कर्णधार कपिल देव निखंज यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती भारतीय क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष व कपिल देव यांचे जवळचे मित्र अशोक मल्होत्रा यांनी दिली आहे.
छातीत दुखू लागल्याने त्यांना येथील फोर्टिस रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचारही सुरू असून त्यांची ऍन्जिओप्लास्टी करण्यात आल्याचेही मल्होत्रा यांनी सांगितले आहे. त्यावेळी कपिल देव यांची पत्नी रोमी त्यांच्यासमवेत होती. कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त शुक्रवार सकाळपासून प्रसिद्ध होत होते. मात्र, ती केवळ अफवा असल्याचेही रोमी यांनी सांगितले आहे.
61 वर्षीय कपिल देव यांनी 1983 साली भारतीय क्रिकेट संघाला आपल्या नेतृत्वात विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आज वयाच्या 61 व्या वर्षीही ते भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत. 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतल्यावरही ते एक मार्गदर्शक तसेच समालोचक म्हणून कार्यरत आहेत.
Kapil Dev in good spirits after his angioplasty. Praying for his full recovery. He is a legend. #KapilDev pic.twitter.com/YJ94dPjwdv
— Abhinav Jaipur (@asabhisays) October 23, 2020
आपल्या कारकिर्दीत कपिल देव यांनी भारताकडून 131 कसोटी तसेच 225 एकदिवसीय सामने खेळले. जागतिक स्तरावर त्या काळातील सर्वोत्तम अष्टपैलू म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली.
कसोटी कारकिर्दीत 5 हजार 248 धावा व 434 बळी, एकदिवसीय सामन्यांत 3 हजार 783 धावा व 253 बळी अशी आचंबित करणारी कामगिरी त्यांनी केली आहे. त्यावेळी फिरकी गोलंदाजांचे भारतीय क्रिकेटमध्ये वर्चस्व असतानाही कपिल देव यांनी संघाला अनेक विजय मिळवून दिले.
पुढे भारतीय क्रिकेटमध्ये कपिल देव यांच्याकडून प्रेरणा घेत शेकडो युवक वेगवान गोलंदाजीकडे वळले.
कपिल देव यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञ त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत.
सोमवारी रुग्णालयातून सोडणार
कपिल देव यांच्या प्रकृतीसाठी जगभरातून प्रार्थना सुरू आहेत. त्यांच्यावर ऍन्जिओप्लास्टी करण्यात आल्यानंतर ब्लॉकेजेस दूर करण्यात आल्याचे त्यांची पत्नी रोमी यांनी सांगितले आहे. तसेच पुढील दोन दिवसांत त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल व त्यानंतर सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याचेही रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे.