बॉलीवूडमध्ये सध्या रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या आगामी “83′ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपट भारताला पहिलावहिला वन डे विश्वचषक जिंकून देणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिलदेव यांच्यावर आधारित आहे.
यातील विशेष बाब म्हणजे, भारताच्या ऐतिहासिक विजयावर कबीर खान यांनी बनविलेल्या या चित्रपटातून कपिलदेवची मुलगी अमियादेखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. अर्थात, अमिया रुपेरी पडद्यावर दिसणार नाही तर तिने कबीर खान यांची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे.
“83′ चित्रपटात अनेक क्रिकेटपटूंची मुले पडद्यावर प्रथमच दिसतील पण अमियाने त्या सर्वांपेक्षा वेगळी कामगिरी बजावली आहे. अमिया कपिलदेव आणि रोमी यांची एकुलती एक मुलगी आहे. ती नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहिली आहे. तिने सर्व फोकस शिक्षणावरच केंद्रित केला होता आणि अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून ती आता बॉलीवूडमधील करियरसाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे तिचा पहिलाच चित्रपट वडिलांनी मिळविलेल्या ऐतिहासिक यशावर चित्रित झाला आहे.
दरम्यान, चित्रपटाचे शुटींग आणि पोस्ट प्रोडक्शन कामे पूर्ण झाली असून करोना संकटामुळे त्याची रिलीज डेट पुढे ढकलली गेली आहे.