नवी दिल्ली – क्रिकेटचे सामने कमी केले नाहीत तर एक दिवस खेळाडूंना विमानातून थेट मैदानावरच उतरावे लागेल, असे काही दिवसांपूर्वी विराट कोहली म्हणाला होता. हाच धागा पकडून माजी कर्णधार कपिल देव यांनी खेळाडूंवर खोचक टीका केली आहे. विश्रांती हवी आहे ना मग आयपीएल खेळू नका, असे सांगत कपिल यांनी कोहली आणि कंपनीला फटकारले आहे.
इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) यंदाच्या मोसमाला येत्या 29 मार्चपासून सुरुवात होत आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा होत असल्याने त्याच्या तयारीसाठी आयपीएलला महत्त्व आले आहे. अर्थात हे चित्र एकीकडे दिसत असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे खेळाडूंवर प्रचंड ताण येत आहे. त्याबाबतच कर्णधार कोहलीने विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितले होते.
गतवर्षीपासून भारतीय संघ सतत्याने सामने खेळत आहे. संघातील रोहित शर्मा वगळता कोणत्याही खेळाडूने विश्रांती घेतलेली नाही. कोहलीने एका मालिकेतून माघार घेतली होती. मात्र, त्यानंतर तो सातत्याने खेळत आहे. याच गोष्टीचा उल्लेख करत कपिल यांनी कोहलीसह संघातील खेळाडूंना लक्ष्य केले आहे.
दुखापत लपवून सामने खेळले गेल्याचेही वारंवार स्पष्ट झाले आहे. आपण जर विश्रांती घेतली व त्यावेळी अन्य खेळाडूने सरस कामगिरी केली तर आपले संघातील स्थान धोक्यात येईल या भीतीने खेळाडू दुखापती लपवतात हे उघड आहे. खेळाडूंवर ही वेळ का आली याबाबत आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. खरेच खेळाडू खूप व्यस्त आहेत, पण जर त्यांना विश्रांतीच हवी असेल तर मग आयपीएल स्पर्धेत का सहभागी होता, अशी विचारणाही कपिल यांनी केली आहे.
सध्या सुरू असलेला न्यूझीलंड दौरा झाल्यानंतर भारतीय संघ मायदेशातच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर प्रमुख खेळाडू बांगलादेशात होत असलेल्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्यानंतर लगेचच आयपीएल सुरू होत आहे, त्यानंतरही विविध दौरे आहेत. हा व्यस्त कार्यक्रम पाहता आता विश्रांती कधी आणि कोणत्या मालिकेतून माघार घ्यायची ते खेळाडूंनी ठरवावे, असेही कपिल म्हणाले.
तंदुरुस्ती टिकवा
खेळाडू जरी सातत्याने सामने खेळत असले तरीही त्यांनी आपल्या तंदुरुस्तीकडे कानाडोळा करून चालणार नाही. संघातील प्रत्येकाने क्रिकेटचा सराव करण्याबरोबरच व्यायामशाळेतही मेहनत करणे आवश्यक आहे. तंदुरुस्ती टिकली तरच संघातील स्थानही टिकेल, असा सल्लाही कपिल यांनी दिला.