राजगुरूनगर – मनसेचे जिल्हाप्रमुख समीर व पत्नी नीलिमा थिगळे यांच्या कन्यारत्नाच्या रूपाने थिगळे कुटुंबात 55 वर्षांनंतर मुलगी जन्माला आली. स्त्री जन्माने आनंदी झालेल्या थिगळे कुटुंबाने “ती’च्या आगमनाचे स्वागत व “ती’चा गृहप्रवेश रविवारी (दि. 8) मोठ्या थाटामाटात व वाजतगाजत केला. “ती’चे शांभवी असे नाव ठेवण्यात आले.
प्रथमच घरी मुलगी जन्माला आली म्हणून तिचे पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत, फुगड्या खेळत जल्लोषात स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी फुग्यांनी व आकर्षक फुलांनी सजवलेल्या घरात रांगोळीचा सडा व फुलांच्या पायघड्यांमध्ये “ती’चा गृहप्रवेश सुद्धा मोठ्या उल्हासात व आनंदात करण्यात आला. जन्मानंतर मामाच्या गावावरून पहिल्यांदाच आपल्या घरी आलेल्या ‘शांभवी’ व तिच्या आईचे स्वागत सनईच्या सुरात व फटाक्यांच्या आतषबाजीत झाले. ‘शांभवी’च्या स्वागतासाठी थिगळे कुटुंबाने घरापासून दोनशे मीटर
अंतर राजगुरूनगर-बहिरवाडी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढली होती. सनई व पारंपरिक वाद्यांच्या गजरात वाजतगाजत तिला घरी आणण्यात आले. या मिरवणुकीत ‘शांभवी’ची आजी अलका व आजोबा नामदेव थिगळे, मामा राहुल गावडे, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, उर्मिला सांडभोर, थिगळे कुटुंबाचे सगे-सोयरे, भाऊबंद व परिसरातील महिला नटून-थटून सहभागी झाल्या होत्या. पेढे, साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थितांना थिगळे कुटुंबाने रुचकर भोजन दिले.
आमच्या घरात 55 वर्षांनी मुलगी जन्माला आली आहे. सर्व कुटुंब खूप आनंदी आहे. या आनंदात नातीचे स्वागत केले. मुलगा-मुलगी एक समान आहेत. स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाकडून व्हायला पाहिजे. स्त्रीभ्रूण हत्या पाप आहे. हे पाप व्हायला नको, यासाठी जागृती झाली पाहिजे.
-अलका थिगळे, शांभवीची आजी