कनिका कपूरची प्लाझ्मा देण्याची तयारी

करोनाच्या संसर्गामधून बरे झाल्यानंतर बॉलिवूडची गायिका कनिका कपूरने अन्य करोनाबाधितांवरील उपचारांसाठी आपल्या रक्‍तातील प्लाझ्मा देण्याची तयारी दर्शवली आहे. याशिवाय संशोधनासाठीही आपल्या रक्‍तातील प्लाझ्माचा उपयोग करण्यात यावा, अशी अपेक्षा तिने व्यक्‍त केली आहे. आपल्यामुळे अन्य कोणाला काही फायदा व्हावा, असे वाटल्याने तिने लखनौच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीशी संपर्क साधला आणि रक्‍तदान करण्याची ईच्छा व्यक्‍त केली.

करोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्‍तीच्या शरीरात विषाणूविरोधात ऍन्टीबॉडीज तयार व्हायला लागलेल्या असतात. त्या ऍन्टीबॉडीजच्या सहाय्याने विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी अन्य औषधेही आवश्‍यक असतात. बरे झाल्यावर या याच रक्‍तातील प्लाझ्मा वेगळा काढून अन्य रुग्णांना उपचारासाठी उपयोग होऊ शकतो. कनिका कपूरने यापूर्वीही हॉस्पिटलला रक्‍तदान केले आहे. त्या रक्‍तावर तपासण्या केल्या जात आहेत.

गेल्या महिन्यात ब्रिटनमधील कॉन्सर्टवरून परतल्यानंतर क्‍वारंटाईन न होता वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याबद्दल कनिका कपूरवर जोरदार टीका झाली होती. तिच्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. तिची तब्बल 4-5 वेळा टेस्ट केली गेली आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर उपचार घेऊन ती करोनाच्या संसर्गातून बरी झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.