नवी दिल्ली – जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि सीपीआय नेते कन्हैया कुमार आणि दलित नेते जिग्नेश मेवानी यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसनेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी कन्हैया कुमारने काँग्रेसमध्ये सामील होण्याचं कारण सांगितलं.
देशात काही लोक फक्त लोक नसून ती एक विचारधारा आहे. ही विचारधारा या देशाची संस्कृती, इतिहास, वर्तमान आणि भविष्य खराब कऱण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणीतरी म्हटलं होत की, तुम्ही तुमच्या शत्रुची, विरोधकांची निवड करा, मित्र आरोआपच मिळतील. मी माझ्या शत्रुची निवड केली. त्यामुळे देशातील सर्वात जुनी लोकतांत्रिक पक्षात मी सामील होत असल्याचं कन्हैया कुमार यांनी म्हटलं.
काँग्रेस वाचलं नाही तर देश वाचणार नाही, असं केवळ मलाच नाही तर लाखो करोडो युवकांना वाटत आहे. हे देखील आपण काँग्रेसमध्ये सामील होण्याचं प्रमुख कारण असल्याचं कन्हैया कुमारने नमूद केलं.