मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत विरोधात एका मुलाखतीत संजय राऊत यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते. ही मुलाखत न्यायालयात सादर करा. तसेच या सगळ्या प्रकरणादरम्यान कंगनाने केलेले ट्विट्सदेखील कोर्टापुढे सादर करावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने आज दिला आहे.
मुंबईस्थीत कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर बीएमसीने कारवाई केल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात आज चौथ्यांदा सुनावणी पार पडली.
या याचिकेत बीएमसीने आपल्याला पुरेसा वेळ दिला नसल्याचा दावा कंगनाच्या वकिलांनी केला. याचबरोबर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही आक्षेपार्ह शब्दांचा उल्लेख केल्याचे दावा केला आहे. कंगनाचे कार्यालय तोडताना बीएमसीने एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन केले आहे.
कोणतेही अनधिकृत बांधकाम तोडण्यापूर्वी सदरची नोटीस देण्यात येते. तसेच, त्यावर कारवाई करण्यापूर्वी एका आठवड्याचा वेळ दिला जातो. मात्र, कंगनाच्या बाबतीत असे झाले नाही. तिला वेळ न देताच बीएमसीने कारवाई केल्याचा युक्तिवाद कंगनाच्या वकिलांकडून करण्यात आला.
तर कंगनाला या संदर्भात नोटिसा पाठवल्या होत्या; परंतु तिच्याकडून त्यासंदर्भात काहीच उत्तर आलेले नाही. तसेच, हे बांधकाम अधिकृत असल्याचा पुरावा म्हणून कुठलीही कागदपत्रे अथवा नकाशा सदर करण्यात आला नाही. त्यामुळे सदर कारवाई करण्यात आल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.