मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. तिने तिच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक उत्तम भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान, आज या धाकड गर्लचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तिने जम्मू-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. याचे काही खास फोटो तिने शेअर केले आहे. यावेळी तिने आपल्या आयुष्याच्या नवीन वर्षात आपण पदार्पण करत असल्याचे म्हटले आहे.
कंगनाने काही तासांपूर्वी तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. यात वाढदिवसानिमित्त ती खास जम्मू काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात पोहोचल्याचे दिसत आहे. कंगनासह तिची बहिण रंगोलीनेही वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे. कंगनाने हे खास फोटो शेअर करत सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. यापूर्वीही कंगनाने अनेकदा वैष्णोदेवीचे दर्शन घेतले आहे.
View this post on Instagram
कंगनाने शेअर केलेल्या या फोटोत तिने छान कुर्ता आणि पंजाबी लेहंगा परिधान केल्याचे दिसत आहे. तिच्या पाठीमागे वैष्णोदेवी मातेचे मंदिर पाहायला मिळत आहे. या फोटोत ती फार सुंदर दिसत आहे. “आज माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज भगवती श्री वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. देवीच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी आयुष्याच्या नव्या वर्षात पाऊल टाकत आहे. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादाबद्दल सर्वांचे आभार”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.
दरम्यान यासोबत कंगनाने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने वैष्णोदेवीच्या दर्शनानंतर भैरो बाबांच्या दर्शन घेतल्याचे सांगितले आहे. यासोबत तिने या पोस्टमध्ये एक अख्यायिकाही सांगितली आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. यासोबत तिने अनेक फोटोही पोस्ट केले आहे.