मुंबई – लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार प्रकरणात वादग्रस्त अभिनेत्री कंगना रणौतचा बाॅडीगार्ड कुमार हेगडेला कर्नाटकमधून अटक करण्यात आली आहे. एका मेकअप आर्टिस्टने कुमार हेगडेविरूद्ध लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार मुंबईतील डीएन नगर पोलिसात दाखल केली होती. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला त्याच्या गावातून अटक केली.
पोलिसांनी पीटीआय न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या एका टीमने कुमार हेगडेला शनिवारी मंड्याच्या हेगडाहळ्ळी येथून अटक केली आहे. कुमारने तक्रारदार महिलेशी संपर्क तोडला होता. त्यामुळे तक्रारदार महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याने तिच्याकडून 50 हजार रुपयेही घेतले असून ते परत केले नसल्याचा आरोप महिलेने केला आहे.
तक्रारदार महिलेने कंगनाच्या बाॅडीगार्डवर गंभीर आरोप केले आहेत. लग्नाचे आमिष दाखवून कुमारने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. कुमार आणि तक्रारदार महिलेची गेल्या वर्षी जूनमध्ये एका सिनेमाच्या शुटींगवेळी भेट झाली होती. त्यानंतर त्यांची ओळख वाढली. कुमारने तिला लग्नाची विचारणा केली. लग्न करण्याचे आमिष दाखवून लिव्ह-इन मध्ये राहण्यास सांगितले.
एकत्र राहत असताना कुमार हेगडेने महिलेसोबत शरिरसंबंध ठेवले. महिलेने सुरुवातीला विरोध केला मात्र, लग्न करण्याचे आश्वासन देऊन त्याने तिला शरिरसंबंध ठेवण्यास बळी पाडले. तसेच आईची तब्येत खराब असल्याचे सांगत कुमारने महिलेकडून 50 हजार रूपये घेतले. तेव्हापासून तो तिच्या संपर्कात नव्हता, असे मेकअप आर्टिस्ट महिलेने पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.