मानहानी प्रकरणी कंगनाची उच्च न्यायालयात धाव

मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनावतने पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ज्येष्ठ गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने सुरू केलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती देत ती रद्द करावी, अशी मागणी कंगनाने या याचिकेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

कंगनाने दाखल केलेल्या या याचिकेमध्ये तिच्याविरोधात दंडाधिकारी न्यायालयाने बजावलेले आदेश आणि सर्व समन्सला तसेच सुरू केलेल्या कारवाईलाही ऍड. रिझवान सिद्दिकीमार्फत आव्हान दिले आहे. 

तसेच न्याय दंडाधिकाऱ्यांनी जुहू पोलिसांना या तक्रारीबाबत चौकशीचे निर्देश देण्याऐवजी, तक्रारदार जावेद अख्तर आणि साक्षीदारांच्या साक्षींची आधी पडताळणी करणे आवश्‍यक होते, असे याचिकेतून नमूद केले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी पार पडण्याची शक्‍यता आहे.

तसेच न्याय दंडाधिकाऱ्यांनी उघडपणे पोलीस यंत्रणेचा वापर करून बेकायदेशीररित्या साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत, असा आरोपही कंगनाने केला आहे. यामुळे आरोपींच्या अधिकारांचे रक्षण करण्यास दंडाधिकारी अपयशी ठरले असून हा प्रकार आरोपींच्या स्वातंत्र्यावर आणि हक्कांवर गदा आल्यासारखा असल्याचेही कंगनाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.