बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतला सेन्सॉर बोर्डाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. कंगना रणौतच्या इमर्जन्सी चित्रपटाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सेन्सॉर बोर्डानं इमर्जन्सी चित्रपटाला U/A सर्टिफिकेट दिलं आहे. इमर्जन्सी चित्रपट मागच्या काही दिवसांपासून सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत अडकला होता, आता या चित्रपटात काही बदल केल्यानंतर सेन्सॉरनं या चित्रपटाला हिरवा कंदील दिला आहे.
इमर्जन्सी चित्रपटात केले 10 मोठे बदल
सेन्सॉर बोर्डाने इमर्जन्सी चित्रपटाला रिलीज करण्याची परवानगी दिली आहे, पण यासाठी काही कडक सूचनाही दिल्या आहेत. रिलीजपूर्वी इमर्जन्सी चित्रपटात 10 मोठे बदल करावे लागणार आहेत. यासोबतच चित्रपटातून तीन मोठे सीन कापावे लागणार आहेत. या बदलांसोबतच चित्रपटात जिथे वादग्रस्त विधाने असतील तिथे वस्तुस्थिती दाखवावी असे सेन्सॉर बोर्डाने म्हंटले आहे.
चित्रपटाविषयी थोडक्यात
कंगनाने ‘इमर्जन्सी’चे दिग्दर्शनही केले असून या चित्रपटाचे लेखन रितेश शाह यांनी केले आहे. मिलिंद सोमण, महिमा चौधरी, श्रेयस तळपदे, सतीश कौशिक आणि अनुपम खेर यांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहे. दिवंगत सतीश कौशिक यांचा हा शेवटचा चित्रपट आहे. कंगनाने हा चित्रपट तिच्या प्रोडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स बॅनरखाली झी स्टुडिओच्या सहकार्याने बनवला आहे.