“थलाइवी’च्या शुटिंगसाठी कंगना दक्षिण भारतात रवाना, फॅन्सला केली ‘ही’ विनंती

मुंबई – बॉलिवुडमधील आगामी “थलाइवी’ या चित्रपटातील अभिनेत्री कंगना रणावतचा पहिला लुक टीजर आणि पोस्टर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. “थलाइवी’ हा चित्रपट तमिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित असून, चित्रपटात कंगना जयललिताच्या भूमिकेत झळकणार आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुमारे तीन ते चार महिन्यांपासून सर्व चित्रपटांचे शूटींग थांबले होते. मात्र, आता काही मार्गदर्शक सूचनांनुसार चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे चित्रीकरण पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व कलाकारांनी त्यांचे उर्वरित प्रोजेक्टचे काम सुरू केले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणावत देखील पुन्हा कामावर परतली आहे. कंगना 7 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर थलाइवी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. कंगनाने स्वत: तिच्या सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

कंगना म्हणाली की, “मित्रांनो आज एक खास दिवस आहे. मी आज संपूर्ण 7 महिन्यांनंतर कामावर परत येत आहे. माझ्या अत्यंत महत्वाकांक्षी द्विभाषिक प्रकल्प थलाइवी चित्रपटासाठी मी दक्षिण भारतात जात आहे. महामारीच्या वेळी मला तुमच्या प्रार्थनेची आवश्यकता आहे. आशा आहे की, मी आज सकाळी शेअर केलेले सेल्फी तुम्हाला आवडतील”. अशा आशयाचे ट्विट कंगनाने केलं आहे.

दरम्यान, थलाइवी चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना कठोर परिश्रम घेत असून चित्रपटाच्या टीझरमधून त्याची झलक दिसून आली आहे. हा टिझर पाहिला असता जयललिताच्या भूमिकेत कंगणा असल्याचे कोणीही ओळखू शकत नाही. यावरूनच या भूमिकेसाठी कंगणाने जोरदार तयारी केली असल्याचे दिसून येते. ‘थलाइवी’ हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.