नवी दिल्ली – ज्यो बायडेन यांनी अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीत आपल्या प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांना कडवी झुंज देऊन पराभूत केले आहे. सर्व जगात बायडेन यांचा उदोउदो सुरू आहे.
मात्र, वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमीच चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने बायडेन यांच्या विरोधात सूर काढला आहे. बायडेन यांच्यावर टीका करत कंगणाने त्यांचा चक्क ‘गजनी’ असा उल्लेख केला आहे.
याबाबत कंगनाने ट्विट केले की, ‘बायडेन यांच्या विजयाचा जास्त आनंद साजरा करू नका. कारण ज्याचा डाटा प्रत्येक 5 मिनिटांत क्रॅश होतो, तो एक वर्षापर्यंतही टिकणार नाही. मात्र, कमला हॅरिस हा शो पुढे सुरू ठेवणार याबाबत खात्री आहे. जेव्हा एक महिला उभी राहते तेव्ही ती दुसऱ्या एका महिलेसाठीही मार्ग तयार करते. हा ऐतिहासिक दिवस सेलिब्रेट करूया.’
हे ट्विट वाऱ्यासारखे पसरले आहे. कंगनाच्या या ट्विटवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. कारण अमिर खान याचा ‘गजनी’ नावाचा चित्रपट येऊन गेला आहे. यात नायक प्रत्येक 10-15 मिनिटांत सर्व काही विसरतो. त्यामुळे कंगनाने बायडेन यांचा ‘गजनी’ असे अपमानास्पद ट्विट केल्यामुळे अनेकांनी कंगनाला फैलावर घेतले आहे.